मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महाविकास आघाडीची सत्ता उलथवीत एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांसोबत भाजपबरोबर सत्ता स्थापन केली होती त्यानंतर आता निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर हे देखील शिंदे गटात दाखल झाले होते. त्यानंतर त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली, याच वेळेस त्यांनी एक खळबळजनक वक्तव्य केले आहे.
शिंदे गटाचे वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र वायकर म्हणाले कि, मला चुकीच्या प्रकरणात गोवण्यात आले. त्यानंतर माझ्यासमोर तुरुंगात जाणे किंवा पक्ष बदलणे हे दोनच पर्याय उरले होते. जड अंतःकरणानेच मी पक्ष बदलला. नियतीने अशी वेळ कोणावरही आणू नये.
दरम्यान रवींद्र वायकर पुढे बोलताना म्हणाले की, माझ्या हातातील शिवबंधन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वेळेपासून आहे व खांद्यावरचे शिवधनुष्यही. बाळासाहेबांच्या शिवसेनेत 50 वर्षे राहिल्यानंतर मला उद्धव ठाकरे यांची साथ सोडावी लागली, तेव्हा एखाद्या कुटुंबसदस्याला आपण पारखे होतो, तशीच माझी भावना होती. परंतु नियतीने माझ्यासमोर यक्षप्रश्न निर्माण करून ठेवला व नियतीच कसा बदल घडवून आणू शकते, ते सर्वांनीच पाहिले. रवींद्र वायकर यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत यासंदर्भात भाष्य केले.
रवींद्र वायकर म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयानेच मला क्लिनचीट दिली आहे. पण माझे प्रकरण राजकीय असल्याने माझ्यावर दबाव आला. मला तुरुंगात जाणे किंवा पक्ष बदलणे याशिवाय पर्याय नव्हते. त्यामुळे मला दुसरा पर्याय निवडावा लागला, असेही ते म्हणाले. माझ्यावर जेव्हा आरोप झाले तेव्हा मला खूप धावपळ करावी लागली. मी खड्ड्यात होतो आणि त्यामुळेच मला एकनाथ शिंदे यांच्यासोबत जावे लागले. माझे आणि मातोश्रीचे गेल्या 50 वर्षांपासूनचे संबंध आहेत. जेव्हा आपल्या कुटुंबायांशी आपले नाते तुटते तेव्हा जेवढे दुःख होते तेवढेच दुःख मला झाले. त्यामुळे मला नियती कुठे घेऊन जात आहे तिथे मी जात आहे.