जळगाव मिरर | २८ जून २०२४
भुसावळ शहरात जुन्या वादातून माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेतील फरार असलेला संशयित आरोपी सोनू रायसिंग पंडित याला बाजारपेठ पोलिसांनी दि.२७ च्या रात्री भुसावळ बाजार समितीच्या आवारातून अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरामध्ये दि. २९ मे रोजी रात्रीच्या सुमारास भाजपा नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे हे सरदार वल्लभभाई पुतळ्याकडे येत असताना मरीमाता मंदिराजवळ त्यांची गाडी अडवून जुन्या वादातून गोळीबार करून त्यांची हत्या केली होती. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनमध्ये दुहेरी हत्याकांड प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांना अटक केली आहे. या खुनामधील काहीजण फरार होते यात सोनू रायसिंग पंडित हा मारेकरी वाल्मीक नगर भुसावळ येथे राहणारा आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येत असल्याची माहिती बाजारपेठ अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळाली. माहितीच्या आधारे दि. 27 च्या रात्री अकरा वाजेला पथकाने कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ सापळा रचला व फरारा सोनू पंडितला ताब्यात घेतले.
ही कारवाई डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांच्या सुचनेनुसार भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याचे पोहेकॉ रमण सुरळकर, उमाकांत पाटील, प्रशांत परदेशी, प्रशांत सोनार, दिनेश कापडणे, राहुल भोई, अमर आढळे, प्रशांत लाड यांनी केली आहे.