जळगाव मिरर | २३ जुलै २०२४
घरात वारंवार होणाऱ्या भांडणातून अल्पवयीन मुलासह त्याच आईने लोखंडी रॉड व विटाने पित्याला मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या विकास शंकर पाटील (वय ३८, रा. कुरंगी, ता. पाचोरा) यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास कुरंगी गावात घडली. याप्रकरणी पाचोरा पोलिसात मुलासह त्याच्या आईविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील कुरंगी गावात विकास शंकर पाटील यांचा वारंवार कौटुंबिक वाद सुरु होता. दि. २१ जुलै रोजी दुपारच्या सुमारास विकास पाटील यांचे पत्नी सोनाबाई व मुलासोबत कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात मुलाने वडीलांना लोखंडी रॉडने मारहाण केली. या मारहाणीत विकास पाटील यांच्या पाठीवर आणि मानेवर गंभीर दुखापत झाले होते. दरम्यान विकास पाटील यांच्या घरातुन आरडाओरडचा आवाज आल्याने शेजारी आले. तेव्हा विकास पाटील हे घरात बेशुद्ध अवस्थेत पडलेले होते. त्यांना तात्काळ ग्रामस्थांनी पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी विकास पाटील यांची प्रकृती चिंताजनक असल्याने जळगाव येथे हलविण्याचा सल्ला दिला. मात्र ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी विकास पाटील यांना मृत घोषित केले.
घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये सोनाबाई विकास पाटील व त्यांचा अल्पवयीन मुलगा यांचे विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आहे. सोनाबाई पाटील व अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार हे करीत आहे.