
जळगाव मिरर | ३१ जुलै २०२४
भुसावळचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या पथकाने जामनेर रोडवरील साई मंदिराजवळील एका गोदामातून ५ लाख २० हजारांचा विमल गुटखा जप्त केल्याने शहरातील गुटखा तस्कर हादरले आहेत. या प्रकरणी शहरातील लहान मारोती मंदिराजवळील तापी नगरमधील संशयित उमेश भगवान पाटील (वय ३०) व सिंधी कॉलनीतील किशोर अघीचा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर रोडवरील साई मंदिराजवळील एका गोदामात गुटख्याचा साठा असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांना मिळाली होती. याबाबत त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिल्यानंतर सोमवारी सकाळी पथकाने छापेमारी केली. या वेळी संशयीत उमेश पाटील यास गोदामात गुटख्याच्या साठ्यासह पकडण्यात आले. संशयिताने गुटख्याचा साठा हा किशोर अघीचा यांचा असल्याचे सांगितले. या वेळी तीन लाखांचा विमल पानमसाला, एक लाख ६० हजारांचा केसरयुक्त विमल पानमसाला, ६० हजारांची केसरयुक्त तंबाखू असा एकूण ५ लाख २० हजारांचा साठा जप्त करण्यात आला. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार नंदकिशोर सोनवणे, अनिल झुंजारराव, स्वप्नील पाटील, श्रीकांत ठाकूर यांच्या पथकाने केली.





















