जळगाव मिरर | ६ नोव्हेंबर २०२६
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चोरी व घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. या वेळी हरवलेले मोबाईल पोलिसांनी शोधून काढत त्यांच्या मूळ मालकांना परत केले. तसेच ग्रामीण भागातील सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी ३०० युवकांनी ग्रामसुरक्षा दलाची जबाबदारी स्वीकारली.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपअधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड व सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडला. ग्रामसुरक्षा दलाच्या सदस्यांना टी-शर्ट व ओळखपत्र देण्यात आले. पोलीस पाटलांनी या उपक्रमात महत्त्वाची भूमिका बजावली. ग्रामसुरक्षा दलाचे युवक रात्री पहारा देऊन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासह संशयास्पद हालचालींची गोपनीय माहिती पोलिसांना देणार आहेत. सूत्रसंचालन सचिन दायमा यांनी केले. या वेळी विजय माळी, विजयकुमार ठाकूरवाड व अशोक नखाते यांनी मार्गदर्शन केले. आभार हवालदार महेंद्र मराठे यांनी मानले.





















