जळगाव मिरर | १ ऑगस्ट २०२४
राज्यातील अनेक शहरात पावसाचा हाहाकार सुरु असून नुकतेच नाशिक शहरात डेंग्यू, चिकुनगुनिया पाठोपाठ तापसदृश आजाराच्या साथीने नाशकात थैमान घातले आहे. गेल्या महिनाभरातच तापसदृश आजाराचे १०६८ रुग्ण आढळले आहेत. ही रुग्णसंख्या केवळ महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी आलेल्या रुग्णांची असून, खासगी रुग्णालयात दाखल तापसदृश आजाराच्या रुग्णांची संख्या यापेक्षा कितीतरी पटीने अधिक असल्यामुळे नाशिककरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या तीन महिन्यांपासून नाशिक शहराला डेंग्यूच्या साथीने विळखा घातला आहे. मे महिन्यात डेंग्यूचे ३३ रुग्ण आढळले होते. जून महिन्यात या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत जाऊन १६५ नवे रुग्ण आढळले. तर जुलैत पावसाने साचलेल्या डबक्यांनी डेंग्यूच्या साथीला निमंत्रण दिल्याने महिनाभरातच नवीन रुग्णसंख्येचा आकडा ३०७ वर गेला आहे. यामुळे जानेवारी ते जुलै या सात महिन्यात नाशिक शहरातील डेंग्यू बाधितांचा आकडा ५७६ झाला आहे.
डेंग्यूचा वाढता उद्रेक नाशिककरांच्या आरोग्याला बाधा निर्माण करणारा ठरला आहे. डेंग्यू बरोबरच चिकुनगुनिया आणि मलेरिया सारख्या किटकजन्य आजारांचे रुग्णही शहरात मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. त्याचबरोबर तापसदृश आजाराच्या साथीनेही शहरात थैमान घातले आहे. घराघरात तापसदृश आजाराचे रुग्ण आढळत आहेत. अंगदुखी, डोके दुखी, ताप येणे, थकवा जाणवणे अशी या आजाराची लक्षणे आहेत. महापालिकेच्या रुग्णालयांतच या आजाराच्या तब्बल १०६८ रुग्णांनी महिनाभरात उपचार घेतले आहेत. खासगी रुग्णालये, दवाखान्यांमध्ये उपचार घेणाऱ्या तापसदृश आजाराच्या साथीच्या रुग्णांची संख्या यापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. याचबरोबर महापालिका रुग्णालयात सर्दी खोकल्याचे २५५, विषमज्वराच्या ३७ रुग्णांनी उपचार घेतले आहेत.