जळगाव : प्रतिनिधी
जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या गेटसमोर ‘त्या’ तरूणावर हल्ला करून तो तरुण उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या गुन्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून फरार असलेल्या संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
सविस्तर माहिती अशी की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये उपचाराकामी सुरेश विजय ओतारी (वय २८) आणि अरुण भीमराव गोसावी (वय ४७) दोन्ही रा.तुकाराम वाडी हे आले होते. यावेळी रुग्णालयाच्या बाहेर गेल्यावर गेटच्या समोरच त्यांच्यावर भूषण माळी, आकाश मराठे यांच्यासह इतरांनी जीवघेणा हल्ला करून खून करण्यात आला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा झाल्यापासून आकाश उर्फ अकी रविंद्र मराठे हा फरार होता. तो संशयित शहरातील महाबळ परिसरातील संत गाडगेबाबा चौकात फिरत असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यांनी तात्काळ पोहेकॉ विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, पोना विजय पाटील, प्रितम पाटील यांचे पथक रवाना केले. या पथकाने संशयित आकाश मराठे याला अटक केली. त्याला पुढील कार्यवाहीसाठी जिल्हापेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.