जळगाव मिरर | १४ ऑगस्ट २०२४
आगामी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी अद्याप सुरु झालेली नसली तरी शरद पवार व अजित पवार गटाच्या दोन्ही महिला नेत्यामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या आहे. अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केल्यानंतर शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षा अॅड. रोहिणी खडसे-खेवलकर यांनी चाकणकर यांचा समाचार घेत आधी नगरसेवक म्हणून तरी निवडून या मगच आमदारकीचे स्वप्न पाहा, असा पलटवार केला आहे.
चाकणकर यांनी सुळे यांना मुख्यमंत्रिपदाचे डोहाळे लागले आहेत, अशी टीका केली होती. यावरून अजित पवार गट आणि शरद पवार गटाच्या महिला नेत्यांमध्ये वाक्युद्ध रंगले आहे. शरद पवार गटाच्या अॅड. खडसे-खेवलकर यांनी मंगळवारी (दि.13) चाकणकर यांनाच आमदारकीचे डोहाळे लागले असून, त्यांनी आधी नगरसेवक होऊन दाखवावे, अशी टीका केली आहे. तसेच खा. सुळे यांच्यामुळेच चाकणकरांचे अस्तित्व असल्याचे म्हटले आहे. चाकणकरांना महिला आयोगाचे अध्यक्षपद असेल, ते दिले नसते तर आज त्यांची ओळखही त्या स्वतः तयार करू शकल्या नसत्या, असा टाेल खडसे यांनी लगावला आहे.