जळगाव मिरर | २९ ऑगस्ट २०२४
आगामी विधानसभा निवडणुकीची सध्या प्रत्येक मतदार संघात जोरदार चर्चा सुरु असतांना आता पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महायुतीचे टेन्शन वाढवले आहे. त्यांनी पुन्हा एकदा भाजपच्या दिग्गज नेत्याना पाडण्याचा इशारा दिला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी पुन्हा एकदा महायुती सरकारविरोधात दंड थोपटले. यावेळी त्यांनी 29 सप्टेंबरपासून पुन्हा उपोषणाला बसण्याची घोषणा केली. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धडा शिकवण्याचाही निर्धार व्यक्त केला.
सरकारने 28 सप्टेंबरपर्यंत आरक्षण दिले नाही तर मी 29 सप्टेंबरपासून उपोषणाला बसेन. ही आरपारची लढाई आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांची जिरवायची म्हणजे जिरवायचीच, असे ते म्हणाले. मनोज जरांगे यांच्या आरक्षणाच्या आंदोलनाला गुरुवारी 1 वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने झालेल्या एका छोटेखानी बैठकीत मनोज जरांगे यांनी गुरुवारी दुपारी अचानक मराठा आरक्षणासाठी 29 सप्टेंबरपासून उपोषण सुरू करण्याची घोषणा केली. आपल्याला काही झाले तरी समाजाला आरक्षण मिळवून द्यायचे आहे. एक मेल्याने काही फरक पडत नाही. काळजी करू नका. माझे एक कुटुंब उघडे पडले तरी चालेल, पण समाजाचे लाखो कुटुंब मोठे झाले पाहिजेत. आपले उपोषण 29 सप्टेंबरपासून पुन्हा सुरू होईल.
आपल्याला मागे हटून चालणार नाही. आपल्याला या सरकारला वठणीवर आणावेच लागेल. कारण हे सरकार निवडणुकांना घाबरत नाही आणि रस्त्यावरच्या आंदोलनालाही भीत नाही. आपण सरकारला 29 सप्टेंबरपर्यंत वेळ देऊ. तोपर्यंत सरकारने आरक्षण दिले तर ठीक नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील समाज येथे आंतरवाली सराटीत येऊन उपोषणाला बसेल, असे मनोज जरांगे म्हणाले.
मनोज जरांगे म्हणाले, मुंबईला गेल्याने काही होणार नाही. गरज पडली तर आपण तिकडेही जावू. पण तत्पूर्वी सगळा महाराष्ट्र येथे बसू. आता सरकार दिलेल्या मुदतीत काय करते हे पाहू. आपण यांना निवडणुकीतही पाडू. त्यांचे 113 आमदार पाडू म्हणजे पाडूच. आपल्या जातीचे कल्याण केल्याशिवाय आता आम्ही स्वस्थ बसणार नाही. ही आरपारची लढाई आहे. जे होईल ते होईल. मी महिनाभर संपूर्ण महाराष्ट्र फिरेन. सर्वच जिल्हे व तालुके पिंजून काढीन. यावेळी देवेंद्र फडणवीस यांची जिरवायची म्हणजे जिरवायचीच. काय व्हायचे ते होऊ द्या. हे रस्त्यावरच्या लढाईला भीत नाहीत. फडणवीसांना मराठ्यांची माया आहे की नाही हे आपण पाहू. त्यांना 29 सप्टेंबरपर्यंत वेळ दिला आहे. त्यानंतर आपण त्यांना खेटू. त्यानंतर पुन्हा पुढे काय करायचे ते ठरवू.