चाळीसगाव : प्रतिनिधी
आ. मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याने चाळीसगाव तालुक्यात नोव्हेंबर २०२० ते जानेवारी २०२१ या ३ महिन्याच्या कालावधीत हौतात्म्य प्राप्त झालेले शहीद जवान यश देशमुख (पिंपळगाव), शहीद जवान सागर धनगर (तांबोळे खु., शहीद जवान संभाजी पानसरे (शिंदी), शहीद जवान अमित पाटील (वाकडी) यांच्या नावाने त्यांच्या मुळगावी चौक सुशोभिकरण व स्मृतीस्थळ उभारण्यासाठी प्रत्येकी ३० लाख रुपये असा एकूण १ कोटी २० लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
यासंदर्भातील शासन निर्णय दि.२६ मे रोजी ग्रामविकास विभागातर्फे निघाला आहे. केवळ बोलून नव्हे तर कृतीतून शहीद जवानांना आमदार मंगेश चव्हाण यांनी मानवंदना दिली असून राज्यात आतापर्यत मुलभूत सुविधा निधीतून शहिदांच्या नावाने सुशोभीकरण कामांसाठी निधी देण्यास तांत्रिक अडचणी असल्याचे कारण दिले जात होते. मात्र जे शहीद आपले कुटुंब, गाव सोडून देशासाठी प्राणांची आहुती देतात त्यांच्या नावाने शहिदांच्या मुळगावी चौक तयार करण्याच्या धोरणास विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात यावी अशी मागणी आ. मंगेश चव्हाण यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली होती
.
अखेर दोन वर्षांच्या पाठपुराव्यानंतर याबाबत शासन निर्णय निघाल्याने भविष्यात संपूर्ण राज्यभरात मुलभूत सुविधा निधीतून शहीद जवानांच्या नावाने चौकांचे सुशोभीकरण केले जाणार आहे. तसेच येणाऱ्या काळात चाळीसगाव तालुक्यातील यापूर्वी शहीद झालेल्या जवानांच्या नावाने त्यांच्या गावात देखील चौक सुशोभीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती आ. मंगेश चव्हाण यांनी दिली आहे.
शहीद जवानांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी आमदार मंगेश चव्हाण यांनी श्रद्धांजली अर्पण करत असताना उपस्थित जनसमुदायाला शब्द दिला होता की, या सर्व शहीद जवानांच्या नावाने त्यांच्या गावात एक चौक सुशोभित केला जाईल व त्याठिकाणी त्यांचे स्मृतीस्थळ उभारले जाईल. अखेर आ. चव्हाण यांनी आपला शब्द पूर्ण करत पिंपळगाव, शिंदी, तांबोळे व वाकडी या गावांच्या वीर सुपुत्रांच्या नावे चौंक उभारण्यास मंजुरी व निधी मिळवून आणत कृतीशील श्रद्धांजली वाहिली आहे.
शहीद वीर जवानांना कृतीशील श्रद्धांजली देण्याचा पायंडा चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी घालून दिला असून केवळ चाळीसगाव तालुक्यातच नव्हे तर जळगाव जिल्ह्यात कुठेही व कोणत्याही गावात जवान शहीद झाल्यास तेथे अंत्यसंस्कार प्रसंगी फुलांची सजावट, रांगोळ्या आदींच्या तयारीची जबाबदारी ही आ. मंगेश चव्हाण व शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभा चव्हाण यांच्यावतीने घेतली जाते. झालेल्या दुखद प्रसंगी एक आधार देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.