जळगाव मिरर | ६ सप्टेबर २०२४
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे किरकोळ वादावरून दोन गटांमध्ये बुधवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास तुफान दगडफेक झाल्याने गावात तणावाचे वातावरण पसरले होते. पोलिसांनी दंगलीचा गुन्हा नोंदवून संशयित आरोपींविरुद्ध धडक कारवाईस सुरुवात केली आहे. गावात तणावपूर्ण शांतता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येथील दोन ते तीन युवकांचा जिममध्ये किरकोळ वाद झाला. यामध्ये दोघ गटातील लोक जखमी झाले आहेत. पोलिसांनी वेळीच कार्यवाही केल्याने मोठा अनर्थ टळला. दंगलीचे वृत्त वाऱ्यासारखे गावात पसरल्याने गावातील नागरिकांनी पटापट दुकानात बंद केले. यामध्ये परिसरातील वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पोलिसांनीच फिर्याद दिल्यावरुन दोन्ही गटाकडील २५ संशयितांवर दंगल आणि पोलिसांवर प्राणघातक हल्ला व शांतता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यानंतर गावामध्ये तणावपूर्ण शांतता आहे. ऐन सणासुदीच्या काळात शांतता भंग झाल्याने त्याचा परिणाम आगामी काळात होणार असल्याने स्थानिक नागरिकांनी पोलीस प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. घटनेचे गांर्भीय लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी घटनास्थळी भेट दिली आणि स्थानिक पोलिसांना बंदोबस्ताबाबत सूचना केल्या.