जळगाव मिरर | ८ सप्टेंबर २०२४
देशातील लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांच्या पक्षातून अजित पवारांनी बाहेर निघत महायुतीच्या सत्तेत सोबत आले होते मात्र लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठा धक्का बसल्याने अजित पवारांनी जाहीर कार्यक्रमात आपली चूक मान्य केल्याचे दिसून आले आहे. धर्मरावबाबा आत्राम यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात अजित पवार यांनी ही कबुली दिली.
आपल्या वडिलांच्या विरोधात बंडाचा झेंडा उगारलेल्या आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांना त्यांनी सबुरीचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, घरात फूट पाडून मी चूक केली. आता अशी चूक तुम्ही करू नका. वडील सर्वात जास्त प्रेम आपल्या मुलीवर करतो. त्यामुळे नात्यात दुही निर्माण करू नका, धर्मरावबाबा आत्राम यांच्याबरोबरच राहा. नात्यातील फूट समाजाला आवडत नाही. त्याचा अनुभव आम्ही घेतला आहे, असे अजित पवार म्हणाले. वस्ताद एक डाव कायम आपल्याकडे राखून ठेवत असतो, तो शिष्याला सांगत नाही. तो डाव आम्हाला वापरायला लावू नका, असा इशाराही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाग्यश्री आत्राम यांना दिला आहे.