जळगाव : प्रतिनिधी
आपल्यावर निस्वार्थी प्रेम फक्त आई-वडिलच करु शकतात, त्यांच्या प्रेमाचा नेहमी आदर करा, दर महिन्यातून एकदा तरी त्यांची भेट घ्या, त्यांच्याजवळ राहा, जन्मदात्यांचे आशिर्वाद घ्या, दुसर्या मोठ्या शहरात जाऊन वैद्यकीय सेवा देण्यापेक्षा जन्मभूमीतच वैद्यकीय सेवा द्या, तिथे जे स्पेशालिस्ट डॉॅक्टर्स नाहीत, त्याचे पुढे शिक्षण घ्या, हार्डवर्क करा आणि जन्मभूमीलाच कर्मभूमी बनवतं यशस्वी व्हा, असा कानमंत्र गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खा.डॉ. उल्हास पाटील यांनी दिला.
गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ.केतकी पाटील सभागृहात शुक्रवार २७ रोजी विद्यापिठ नियमावलीनुसार आयोजित दिक्षांत सोहळा थाटात पार पडला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष माजी खा. डॉ उल्हास पाटील यांची विशेष उपस्थीती होती. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर सदस्या डॉ. केतकी पाटील, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड, डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरेपीचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर हे उपस्थीत होते. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची प्रार्थना आणि मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी पूजनाने दिक्षांत सोहळ्यास प्रारंभ झाला.
कनव्होकेशन सुरु झाल्याचे जाहिर करताच भावी डॉक्टरांनी जल्लौष केला. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनच्या सचिव डॉ.वर्षा पाटील, डॉ. वैभव पाटील यांच्यासमवेत डॉक्टर्स उपस्थीत होते. डॉ.उल्हास पाटील फिजिओथेरेपीस्ट महाविद्यालयातून तब्बल ४१ डॉक्टर्स आज पदवी संपादन करुन वैद्यकीय सेवेसाठी बाहेर पडले. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.आर्विकर यांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात.
याप्रसंगी विद्यार्थी व पालकांनी मनोगतात महाविद्यालय व प्रशासनाचे कौतुक करत आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन निकीतेश श्रीपाद व आभार समृध्दी यांनी मानले. अंतिम वर्षाच्या विदयार्थ्यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. त्यांना सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.