जळगाव मिरर | १८ सप्टेंबर २०२४
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात लाडक्या बाप्पांला निरोप देत असतांना छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात एक दुर्देवी घटना घडली आहे. २१ वर्षीय तरुण मित्रांसोबत गणपती विसर्जनासाठी गेलेला असतांना त्याचा घाणेगाव येथील तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी दि.१७ सायंकाळी घडली. यात अभय सुधाकर गावंडे (वय २१) असे बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रांजणगाव येथील अभय गावंडे, कुणाल कापसे, रूपेश कंधारकर, रजनीकांत कापसे असे चौघेजण मंगळवारी सायंकाळी गणपती विसर्जनासाठी घाणेगाव येथील तलावाजवळ गेले होते. चौघेजण गणपती घेवून तलावात उतरले यावेळी अभय हा पुढे होता. अभयला तलावातील खोलगट पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो पाण्यात बुडाला. दरम्यान याठिकाणी बंदोबस्त कामी तैनात असलेले पोलिस उपनिरिक्षक प्रभाकर जायभाये, पोलीस अंमलदार बनकर यांनी तात्काळ घटनेची माहिती अग्नीशमन दलाला कळवली. मनपा तसेच एमआयडीसी अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत शोध मोहीम राबवून अभयला बेशुद्ध अवस्थेत पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर त्याला तातडीने घाटी रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.