जळगाव मिरर | २३ सप्टेंबर २०२४
अमळनेर शहरातील गांधलीपुरा परिसरातील एका २८ वर्षीय महिलेचा खून झाल्याची प्राथमिक माहिती दि.२२ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. शितल जय घोगले (वय २८) रा. गांधलीपुरा ही महिला मृत अवस्थेत बाजूला असलेल्या रिकाम्या जागेत पडलेली दिसून आली. सदर महिलेच्या डोक्याला मार लागलेला असून तिच्या गळ्यावर गळा आवळल्याचे व्रण तर डोक्यावर व हातावर वार केलेला दिसून येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी सुनील नंदवाळकर, पोलीस निरीक्षक विकास देवरे, पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील, गणेश पाटील, सागर साळुंखे, निलेश मोरे, जितेंद्र निकुंभे, अमोल पाटील, सिद्धांत शिसोदे, स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकातील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, रवी पाटील, दीपक माळी, प्रवीण मांडोळे, संदीप पाटील यांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. याप्रकरणी दोन जणांना संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान महिलेचे शव विच्छेदनसाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. याबाबत अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी विविध दिशेने तपास चक्रे फिरवायला सुरुवात केली आहे.