जळगाव मिरर | २६ सप्टेंबर २०२४
आगामी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून नुकतेच देशाचे गृहमंत्री व भाजपचे नेते अमित शहा हे राज्यात येवून गेले यावेळी त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांनी तंबी दिली असून आगामी निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे देखील आवाहन केले आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये बसलेल्या फटक्याचा विचार करणे सोडा. पुढील आठ दिवसांत पक्षातील लहान-मोठी भांडणे मिटवा. तुमच्या वादामध्ये पक्षाचे वातावरण खराब होत आहे. विधानसभा उमेदवारीसाठी भांडणे करणाऱ्यांचा विचार होणार नाही याउलट जे शांतपणे पक्षाचे काम करतील त्यांचा विचार होईल, अशी तंबी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी (२५ सप्टेंबर) दिली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या उत्तर महाराष्ट्र कार्यकर्ता बैठकीत सर्वांचेच कान टोचत त्यांनी उमेदवारीसाठी उड्या मारणाऱ्यांना सबुरीचाही सल्ला दिला.
४५ मिनिटांच्या भाषणात ते असेही म्हणाले की, भाजप कार्यकर्त्यांनी मित्रपक्षांना पाडले तर आपल्याच (भाजप) हातातून सत्ता जाईल. मित्रपक्षांविरुद्ध काही करणे म्हणजे उद्धवसेना, शरद पवार गटाला मदत केल्यासारखे होईल. गेल्या काही दिवसांपासून बहुचर्चित असलेला वक्फ बोर्ड कायदा येत्या हिवाळी अधिवेशनात रद्द केल्याशिवाय राहणार नाही, असा दावा करत शहा म्हणाले की, केंद्रात सत्ता आल्यानंतर पाकिस्तान व दहशतवाद्यांचे हल्ले थांबले, सीमेकडून होणारे हल्ले कमी झाले.
फक्त पाच टक्के गुणांचा फरक; निराश होऊ नका : लोकसभेला पाच टक्के कमी गुण मिळाले. मात्र ज्यांना (इंडिया आघाडी) वीस टक्के गुण होते त्यांना २५ टक्के गुण मिळाले म्हणून ते मिठाई वाटत सुटले आहेत. फरक पाच गुणांचा आहे. निराश होऊ नका. पक्ष सक्षमीकरण करा : स्वतःचा परिवार व किमान तीन ते चार कुटुंबांवर लक्ष केंद्रित करून त्यांना पक्षाशी जोडण्यासाठी प्रयत्न करा. विरोधकांचे नरेटिव्ह खोडून काढा : संविधानविषयी विरोधकांचे नरेटिव्ह खोडून काढा. अमेरिकेत राहुल गांधी यांनी आरक्षण हटविण्याची केलेली भाषा लोकांपर्यंत पोहाेचवली पाहिजे.