जळगाव मिरर | ५ ऑक्टोबर २०२४
शहरातील शिवाजी नगरातील ख्रिश्चन कब्रस्तानाजवळ किरकोळ कारणावरून वृध्द महिलेला शिवीगाळ करत धारदार वस्तूने वार करून गंभीर जखमी करून कुटुंबाला जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार गुरूवार ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता समोर आला आहे. याप्रकरणी रात्री १० वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगलाबाई लालचंद परदेशी (वय ६२) या वृध्द महिला या मुलगा, सुन व नातवंडे यांच्यासोबत वास्तव्याला आहेत. त्यांचा मोठा मुलगा गणेश परदेशी आणि सुन शारदा परदेशी हे नेहमी त्यांच्या सासरवाडीला जातात या कारणावरून सुरेंद्र परदेशी रा. शिवाजी नगर, जळगाव याने गुरूवार ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता मंगलाबाई परदेशी यांना शिवाजी नगरातील ख्रिश्चन कब्रस्तानाजवळ दारूच्या नशेत येवून शिवीगाळ करत चापटाबुक्क्यांनी मारहाण केली.
तसेच धारदार वस्तूने वार करत गंभीर जखमी करून मुलगा, सुन व नातूला जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी रात्री १० वाजता मंगलाबाई परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.