जळगाव : प्रतिनिधी
निमखेडी शिवारात सुकृती ड्रीम प्रोजेक्ट या 240 घरांचे सांडपाणी निमखेडी शिवारातील रहिवाश्यांच्या घरात जात असल्यामुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे. येथील रहिवाशांनी मंगळवारी मनपात आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची भेट घेवून पाहणी करण्याची विनंती केली.
निमखेडी शिवारातील गट नं 338/339 प्लॉट नं. 301 प्रभाग 10 येथे अरिहंत डेव्हलपर्सचे प्रो. प्रा. बिल्डर अनिल शाह यांनी बांधकाम केलेल्या सुकृती ड्रीम होम यामध्ये240 घरांचे बांधकाम आहे. या 240 घरांचे सांडपाणी राष्ट्रीय महामार्गाच्या दुसऱ्या बाजूला मौजे निमखेडी शिवारातील गट नं.121, प्लॉट. नं. 27 प्रभाग 8 येथे राष्ट्रीय महामार्गाच्या अंडरपास असलेल्या जुन्या छोट्या बोगद्याच्या खालून सोडण्यात आले आहे. सुकृती ड्रीम येथील 240 घरांचे सांडपाणी या रहिवाश्यांच्या घरात येत आहे. मागच्या वर्षीही हे सांडपाणी घरात शिरुन या रहिवाश्यांचे अन्न धान्यासह अतोनात नुकसान झाले आहे. याबाबत हे रहिवाशांनी अभियंता प्रकाश पाटील आरोग्य अधिकारी नंदू साळुंखे यांना भेटले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. या नागरिकांनी मंगळवारी आयुक्त डॉ . गायकवाड यांची भेट घेवून प्रत्यक्ष पाहणी करुन या त्रासातून सुटका करण्याची मागणी केली आहे.