जळगाव मिरर | २२ ऑक्टोबर २०२४
जामनेर तालुक्यातील पहूर येथे भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत दौलत धोंडू कुंभार (वय ६८) या वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना छत्रपती संभाजी नगर राष्ट्रीय महामार्गावर रविवार दि. २० रोजी सकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील पहूर येथील दौलत कुंभार हे रस्त्याने जात असतांना त्यांना महामार्गावरुन भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात कुंभार यांचा जागीच मृत्यू झाला. परिसरातील नागरिकांनी त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी राहुल निकम यांनी तपासणी करीत मयत घोषित केले. शवविच्छेदनानंतर दुपारी दोन वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास विलास चव्हाण करीत आहे.
राष्ट्रीय महामार्गाचे काम अजूनही पूर्ण झाले नसून वाहने सुसाट वेगाने धावत आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आवश्यक त्या ठिकाणी सूचनाफलक लावावेत, ऑटोमॅटिक सिग्नल सिस्टीम सुरू करावी, तसेच महामार्गावर पांढरे पट्टे मारण्याची मागणी नागरिकांनी केली आहे