जळगाव मिरर | २६ ऑक्टोबर २०२४
शहरातील कालंका माता परिसरातील सदोबा नगरात नवीन घराचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी मधुकर भागवत पाटील (वय ७५) यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी अडीच वाजता उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, मधुकर पाटील यांना गेल्या अनेक दिवसांपासून गुडघ्याचा त्रास होता. सदोबा नगरातील मातृभूमी चौकात त्यांच्या नव्या घराचे बांधकाम सुरू आहे. तेथे ते रोज बांधकामाच्या ठिकाणी जात होते. शुक्रवारी दुपारी पुतण्या चहा घेऊन बांधकामाच्या ठिकाणी गेले असता पाटील यांनी वरच्या मजल्यावर गळफास घेतल्याचे दिसून आले. शेजारी राहणारे महेश भोळे व अन्य सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावर रुग्णालयात हलवले असता तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पाटील हे मूळचे भादली येथील रहिवासी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे.