जळगाव मिरर | २७ ऑक्टोबर २०२४
यावल सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या वड्री गावाजवळील वड्री धरण परिसरात असलेलया मनुदेवी मंदिराच्या परिसरात बिबट्याच्या बछड्याने केलेल्या हल्ल्यात १२ वर्षीय बालक जखमी झाला. बालकाला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील वड्री धरणाजवळ असलेल्या मनूदेवी मंदिराजवळ शनिवारी दुपारच्या सुमारास बिबट्याचे बछडे पाणी पिण्यासाठी आले होते. त्याठिकाणी विनोद रुपसिंग बारेला (वय १२) हा बालक सांडव्यातील पाण्याजवळ गेला. त्यातील एका बछड्याने या बालकावर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा बालकाने तेथुन धाव घेतली असता बिबटच्या बछड्याने त्याच्या पाठीवर पंजा मारुन त्याला जखमी केले. हा प्रकार नागरिकांच्या निदर्शनास येताच नागरिकांनी गर्दी करून तेथे धाव घेतल्यामुळे गर्दीला पाहून बिबट आणि त्याचे बछडे तिथून पळुन गेले. दरम्यान तातडीने या बालकाला यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.
या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे, डॉ. शर्मा, मंजुषा कोळेकर, अतिश खडके यांनी त्याच्यावर प्रथम उपचार केले त्याची प्रकृती स्थिर आहे. धरण परिसरात एक बिबट आणि त्याचे पाच बछडे वावर करत असल्याचे प्रत्यक्षदर्शी रूपसिंग बारेला यांनी सांगितले. अनेक वेळा सांडव्यात पाणी पिण्यासाठी ते येत असतात. या घटनेत बालक थोडक्यात बचावला आहे. तेव्हा वनविभागाने या बिबट आणि त्याच्या बछड्यांना अभयारण्यात सोडावे अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे