जळगाव मिरर | २ नोव्हेबर २०२४
जळगाव शहरातील आव्हाणे रस्त्यावर पंचवटी नगरातील कुटुंबीय दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात गेल्याने घर बंद होते. हीच संधी साधून चोरट्यांनी येथील दोन पाळीव कुत्र्यांवर गुंगीचे औषध फवारून ६३ हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना सोमवारी भरदिवसा घडली. त्यामुळे नागरिक धास्तावले आहे. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील आव्हाणे रस्त्यावरील सावतानगर पाठीमागे असलेले पंचवटीनगरातील रहिवासी गिरिजा शंकर नन्नवरे (वय ३२) हे सोमवारी दुपारी ४ ते ६ वाजेदरम्यान दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गेले असताना चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून बेडरूममधील लोखंडी कपाटाचे कुलूप तोडून लॉकरमध्ये ठेवलेले ६३ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. चोरट्यांनी ३, ४ व ५ ग्रॅमच्या प्रत्येकी एक अशा तीन सोन्याच्या अंगठ्या, सहा ग्रॅमचे टोंगल व तीन ग्रॅमचे सोन्याचे लॉकेट असे एकूण ६३ हजारांचे सोन्याचे दागिने तसेच दोन महिन्यांपूर्वी मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला भेट मिळालेले चांदीचे दागिनेही चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात बुधवारी घरफोडीचा गुन्हा दाखल झाला.
नन्नवरे यांचे घर पंचवटी नगरात आहे. या ठिकाणी अजून फारशी वस्ती नाही. त्यांनी दोन कुत्रे पाळलेले आहेत. सोमवारी ते बाहेर गेले असताना घराच्या कंपाउंडमध्ये कुत्रे बसलेले होते. त्यांना चोरट्यांनी गुंगीचा सप्रे मारून झोपवून ही घरफोडी केली. नन्नवरे कुटुंबीय संध्याकाळी ६ वाजता परत आले तेव्हा कुत्रे झोपलेले दिसून आले.