जळगाव मिरर | २२ नोव्हेबर २०२४
जळगाव शहरात मतदान करुन परत येत असलेल्या सिद्धार्थ माणिक वानखेडे (वय ३५, रा. राजमालतीनगर) या तरुणाचा मारहाणीत मृत्यू झाला. त्याचा मृत्यू झाल्याचे कळताच मारहाण करणारे दोघे फरार झाले होते. एलसीबीच्या पथकाने सापळा रचून दोघ संशयितांना मध्यरात्रीच्या सुमारास ताब्यात घेतले. त्यानंतर कुटुंबियांच्या मागणीनुसार मयताचे वैद्यकीय समितीसमक्ष शवविच्छेदन केल्यानंतर तरुणावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील राजमालतीनगरात सिद्धार्थ माणिक वानखेडे (वय ३५) कुटूंबीयांसह वास्तव्यास होते. बुधवारी मतदान करुन परत येत असतांना सुरतलाईन रेल्वेगेटवर त्याच्यावर हल्ला करण्यात आला. टोळक्याकडून त्यांना मारहाण झाल्याने त्यामध्ये सिद्धार्थ यांचा मृत्यु झाला. मारेकऱ्यांच्या अटकेसाठी कुटुंबीयांनी शहर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले होते. मात्र, गुन्ह्यातील प्रमुख सुत्रधार माजी नगरसेवक राजु पटेल यांच्यासह चौघांवर रुग्णालयात उपचार सुरु असून त्याचे अन्य दोन साथीदार मात्र घटनास्थळाहून पसार झाले होते. त्यांच्या अटकेसाठी मयताच्या कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली होती. यावेळी एलसीबीचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी फरार संशयितांना तात्काळ अटक करण्याचे आश्वासन दिले होते. पोलिसांच्या आश्वासनानंतर कुटूंबीयांनी अंदोलन मागे घेतले होते.
सिद्धार्थ यांच्यावर दोन वेळा बायपास शखक्रिया झाली होती, त्यांच्या छातीवर लाकडी दांडक्यांनी हल्ला चढवल्याने अंतर्गत दुखापत होवुन त्यांचा मृत्यु ओढवला होता. याप्रकरणी कुटूंबीयांच्या मागणीनुसार मृतदेहावर वैद्यकीय समितीसमक्ष शवविच्छेदन करण्यात येवुन दुपारी दोन नंतर मृतदेह कुटुंबीयांना सोपवण्यात आला.
खूनाच्या गुन्ह्यातील संशयितांपैकी जिल्हा रुग्णालयात माजी नगरसेवक राजू पटेल, महेमूद पटेल, आवेश पटेल, जानू उर्फ रेहान पटेल यांच्यावर उपचार सुरु आहे. त्याठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. फरार असलेल्या दोघांना अटक करण्यात आली असून जखमीचा रुग्णालयातून डिक्वार्ज झाल्यानंतर त्यांना देखील ताब्यात घेवून अटक केली जाईल, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी दिली.
माजी नगरसेवक राजु बिस्मील्ला पटेल, संजू पटेल, मेहमुद पटेल, आवेश पटेल, जस्मीन पटेल, जानू ऊर्फ रेहान पटेल यांच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला. यातील चौघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून दोघे फरार होते. निवडणुकीचा बंदोबस्त संपताच एलसीबीचे सफौ विजयसिंग पाटील व जितेंद्र पाटील यांनी तपासचक्रे फिरवित संशयित संजू बिसमिल्ला पटेल (वय ४७) व जास्मिन राजू पटेल (वय २७, दोघ रा. राजमालती नगर) यांच्या एरंडोल येथून मुसक्या आवळल्या