जळगाव मिरर | २५ नोव्हेबर २०२४
घरी कोणीही नसताना पोटच्या मुलीला गळफास देत सोनाली दीपक दाभाडे (३६, रा. व्यंकटेशनगर) या महिलेने स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना रविवारी दुपारी व्यंकटेशनगरमध्ये घडली. दुपारी महिलेचे पती दीपक दाभाडे हे घरी परतले व दरवाजा उघडताच त्यांना पत्नी व मुलगी तेजस्विनी हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील हरिविठ्ठलनगर परिसरातील व्यंकटेशनगरमध्ये दीपक दाभाडे हे तिसऱ्या मजल्यावर राहतात. भुसावळ येथे त्यांच्या नातेवाईकांचे निधन झाल्याने रविवारी सकाळी ते आपल्या दोन भावांसह गेले होते. त्यावेळी घरी दीपक यांच्या पत्नी सोनाली व मुलगी तेजस्विनी होती. घरात कोणीही नसताना सोनाली यांनी आठ वर्षीय मुलीला छताच्या पंख्याला दोरीने गळफास दिला व स्वतःदेखील दुसऱ्या दोरीने गळफास घेतला.
लग्नानंतर काही वर्ष अपत्य होत नसल्याने दीपक यांनी मोठे भाऊ जितेंद्र यांची मुलगी काव्या हिला दत्तक घेतले होते. त्यानंतर दीपक व सोनाली या दाम्पत्याला मुलगी झाली. रविवारी ही घटना घडली त्यावेळी काव्या खालच्या मजल्यावर खेळत होती. पत्नी व मुलीने गळफास घेतल्याचा मोठा धक्का दीपक यांना बसला व त्यांचा रक्तदाब कमी झाला होता.
दाभाडे दाम्पत्यामध्ये कोणताही वादविवाद नव्हता, असे त्यांच्या नातेवाईकांसह मित्रपरिवाराने सांगितले. काही दिवसांपूर्वीच ते खुलताबाद, वेरूळ, शनि शिंगणापूर या ठिकाणी देवदर्शन करून परतले. त्यानंतरही दैनंदिन कामे नित्यनियमाने सुरू होते. कोणताही वाद नसताना या महिलेने पोटच्या गोळ्यासह आत्महत्या का केली, या विषयी सर्वांना प्रश्न पडला आहे. सोनाली यांना मानेचा व छाती दुखीचा त्रास होता, असे त्यांचे दीर संदीप दाभाडे यांनी सांगितले.
