जळगाव मिरर | २ डिसेंबर २०२४
नंदुरबारहून जळगावला आलेले दोघ मित्र गाडी आऊटरला थांबल्यामुळे रुळावरुन पायी चालत रेल्वे स्टेशनावर येत होते. जळगाव थांबा नसलेल्या एक्सप्रेसने त्या दोघ मित्रांना धडक दिली. यामध्ये ओम विजय वाघेला (वय २३, रा. राजकोट, गुजरात) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा मित्र समर्थ सुनिलसिंग रघुवंशी (वय २२, रा. नंदुरबार) हा गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी दीड वाजता रेल्वे स्टेशनावर घडली. हे दोघ मित्र रेल्वे स्टेशनवर थांबवलेल्या मित्रांसोबत नाशिकला फिरायला जाणार होते. मात्र त्यापुर्वीच दुर्देवी काळाने त्यांच्यावर झडप घातली.
मिळालेल्या माहितीनुसार, राजकोट येथील ओम वाघेला आणि समर्थ सुर्यवंशी हे दोघ मित्र नंदुरबार येथून रेल्वेने जळगावला आले. सुरतहुन येणारी रेल्वे आऊटरला काही वेळ थांबली. बराच वेळ झाला तरी रेल्वे आऊटरला असल्यामुळे दोन्ही मित्रांनी रेल्वेतून उत्तरले आणि ते रेल्वे रूळ लगतच चालत रेल्वे स्टेशन गाठण्याच्च्या निर्णय घेतला, स्टेशनपासून अवघ्या काही अंतरावरच जळगावला थांबा नसलेल्या तुलसी एक्सप्रेसने रुळावरुन चालणाऱ्या दोघ मित्रांना जोरदार धडक दिली. यामध्ये ते दोघे मित्र रेल्वे रूळ लगत फेकले गेले. घटनेची माहिती स्टेशन मास्तर यांनी रेल्वे पोलिसांना दिली. त्यानुसार रेल्वे पोलीस उपनिरीक्षक आर. आर. पाटील, सचिन भावसार, रवींद्र पाटील, राहूल गवळी, नंदू खरडे यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातातील दोघांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केली असता ओम वाघेला याला मृत घोषित केले.
जखमीसह मयतांना रेल्वे स्टेशनावर थांबलेले मित्र फोन करीत होते. पोलिसांनी त्यांचा फोन रिसिव्ह करीत त्यांच्या मित्रांना अपघाताची माहिती दिली. रेल्वेच्या धडकेत एका मित्राचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर असल्याचे कळताच त्या मित्रांनी समर्थ रघुवंशी याला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. समर्थवर उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
ओम व समर्थ हे दोन्ही मित्र बडोदा येथे एकाच महाविद्यालयात शिकायला होते. जळगावहून काही मित्रांसोबत ते नाशिकला फिरण्यासाठी जाणार होते. त्यासाठी जळगाव रेल्वे स्टेशनवर ओम व समर्थ यांचे काही मित्र त्यांना घ्यायला देखील आले होते. मात्र रेल्वे स्टेशनवर पोहोचण्याच्या आधीच त्यांच्याववर काळाने घाला घातला त्यामुळे त्या दोघांची मित्रांसोबत देखील भेट होव् शकली नाही.
