जळगाव मिरर | १८ डिसेंबर २०२४
जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या नूतन मराठा महाविद्यालयात संस्थेच्या कार्यालयातून कागदपत्रांची चोरी, मारहाण करणेप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अटकेत असलेले संशयित अॅड. विजय पाटील यांच्या घराची बुधवारी जिल्हापेठ पोलिसांच्या पथकाने झाडाझडती घेतली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता.
सविस्तर वृत्त असे कि, जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या नुतन मराठा येथील कार्यालयात प्रवेशाला मनाई असतांना देखील संशयितांनी त्याठिकाणी अनधिकृतपणे प्रवेश करुन शिक्षकांचे हजेरी पुस्तक एकुण २, आवक जावक रजिस्टर, मानद सचिव यांच्या नावाने असलेले संस्थेचे लेटर हेड बुक, ऑडीट संदर्भातील कागदपत्रे, तसेच इतर महत्वाची अनेक कागदपत्रे चोरुन नेली, सोबतच प्राचार्य व इतर काही कर्मचाऱ्यांना मारहाण केली. याप्रकरणी जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थचे मानद सचिव निलेश रणजीत भोईटे यांच्या तक्रारीनुसार, तत्कालीन विशेष सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण, अॅड. विजय भास्कर पाटील यांच्यासह संजय भास्कर पाटील, विनोद प्रभाकर पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्यासह पथकाने मंगळवारी अॅड. विजय पाटील यांच्या दिक्षीतवाडीतील घरी जाऊन तपासणी केली. या तपासणीवेळी संस्थेशी संबंधित काही कागदपत्रे आहे का? याची खातरजमा केल्याची माहिती सूत्रांनी दिली.