जळगाव मिरर | १९ डिसेंबर २०२४
कामावरुन घरी पतरणाऱ्या दुचाकीस्वार विठ्ठल पांडुरंग शेळके (वय ५५, रा. रामेश्वर कॉलनी) यांना भरधाव ट्रकने चिरडले. ही घटना बुधवारी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास अजिंठा चौफुली येथे घडली. पोलिसांनी मृतदेह शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केला. याठिकाणी मयताच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. पोलिसांनी ट्रकसह मालकाला ताब्यात घेले असून त्याच्याविरुद्ध रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी पोलिसात ट्रक गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रामेश्वर कॉलनीतील विठ्ठल शेळके हे शहरातील एका नाश्त्याच्या दुकानावर कामाला होते. रात्री दुकानावरुन ते दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाले. यावेळी भुसावळकडून ईच्छादेवी चौफुलीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या (जीजे १४, एटी २४२४) क्रमांकाच्या दाळ घेवून जाणाऱ्या ट्रकने दुचाकीस्वार विठ्ठल शेळके यांना चिरडले. या अपघातात शेळके यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह रुग्णवाहिकेतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत विठ्ठल शेळके यांना मयत घोषीत केले.
अपघाताची माहिती मिळताच शेळके यांच्या कुटुंबियांसह परिसरातील नागरिकांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. याठिकाणी वडीलांचा मृतदेह बघताच त्यांच्या दोघ मुलांनी मनहेलावणारा आक्रोश केला. दरम्यान, पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून त्याच्याविरुद्ध रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. शेळके यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
भरधाव ट्रक चालकाने दुचाकीस्वाराला चिरडल्यामुळे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. संतप्त झालेल्या जमावाकडून ट्रक चालकाला मारहाण करण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र ड्युटी आटोपून घरी जात असलेले एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राजेंद्र उगले यांनी ट्रकसह चालकाला ताब्यात घेत त्यांना पोलीस ठाण्यात आणले.