जळगाव मिरर | २० डिसेंबर २०२४
गेल्या काही दिवसापासून जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी दिलेल्या आदेशानुसार जळगाव शहरातील अनेक ठिकाणी अल्पवयीन दुचाकी चालविणाऱ्या मुलांच्या पालकांना बोलवून तंबी दिली होती. त्यानंतर शहरातील अनेक अल्पवयीन मुलांनी दुचाकी हाती घेणे टाळले त्यानंतर ‘जळगाव मिरर’ने ‘एसपी साहेब तुमच्या ‘त्या’ कारवाईच्या कार्याला सलाम ; पण जरा इकडेही बघाच…’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. त्या वृत्ताची जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी दखल घेत दुसऱ्या आठवड्यात कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.
जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाळांच्या आवारात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर शनिपेठ पोलीसांनी अतिक्रम विभागाच्या मदतीने कारवाई केली. या कारवाईत सहा टपरी चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांच्या टपरी कायमस्वरुपी हटवून त्या मनपाच्या अतिक्रमण विभागाने ताब्यात घेतल्या आहेत.
शहरातील शैक्षणिक संस्थांच्या शंभर मिटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिल्या होत्या. त्यानुसार शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, सपोनि साजीद मंसुरी, उपनिरीक्षक योगेश ढिकले, युवराज कोळी, विजय खैरे, गिरीश पाटील, भागवत शिंदे, विकी इंगळे, अनिल कांबळे यांच्या पथकाने पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या चौबे शाळा, मनपाची १७ क्रमांकाच्या शाळेच्या परिसरातील तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या टपरी चालकांवर यापुर्वी दंडात्मक कारवाई केली होती. मात्र तरी देखील ते पदार्थांची विक्री सुरुच ठेवल्यामुळे गुरुवारी या शाळांच्या शंभर मिटर परिसराच्या आत असलेल्या सहा टपरी चालकांवर मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या मदतीने कारवाई करुन त्या जप्त करण्यात आल्या आहेत.
या कारवाईमध्ये चौबे शाळेजवळील इकबाल शेख उस्मान शेख रा. इस्लामपुरा, शंकर लिंगा गवळी रा. गवळीवाडा, भिका लिंगा गवळी रा. गवळीवाडा, गणी मोहमद डिगी रा. भिलपुरा तर मनपाच्या १७ नंबर शाळेच्या परिसरातील प्रकाश नामदेव पाटील रा. बळीराम पेठ, अब्दुल करीम शेख इसा रा. काट्याफाईल यांच्याविरुद्ध कारवाई करुन त्यांची टपरी जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच पुढील दोन दिवसात इतर शाळांच्या हद्दीतील पानटपरी चालकांवर कारवाई करण्याचा इशारा शनिपेठ पोलिसांनी दिला.
काय होती बातमी
‘एसपी साहेब तुमच्या ‘त्या’ कारवाईच्या कार्याला सलाम ; पण जरा इकडेही बघाच…’
जळगाव शहरातील अनेक शाळा, महाविद्यालय व कोचिंग क्लासेस परिसरात अनेक ठिकाणी हॉटेल व कॅफेच्या नावाखाली तरुण-तरुणी निवांत वेळ शोधून या ठिकाणी आपला वेळ घालवत असतात. यासोबत या ठिकाणी काही तरुण-तरुणी अश्लील कृत्य देखील करत असल्याचे बोलले जात आहे. यासह अनेक शाळा महाविद्यालय व कोचिंग क्लासेस परिसरातील पान सेंटर, दूध डेअरी या ठिकाणी सर्रास गुटखा, पानमसाला व सिगारेट विक्री केली जात आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलं या व्यसनाच्या आहारी जात आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी साहेब जरा या परिसरात देखील आपण विशेष लक्ष द्यावे जेणेकरून अल्पवयीन मुलं व्यसनाच्या आहारी जाणार नाही याची देखील काळजी आपण घ्यावी व त्या दुकानदार व हॉटेलधारकांना देखील तंबी द्यावी हीच विनंती…
एसपी साहेब तुमच्या ‘त्या’ कारवाईच्या कार्याला सलाम ; पण जरा इकडेही बघाच…