जळगाव मिरर | २१ डिसेंबर २०२४
जळगाव जिल्ह्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात महायुतीचे सरकार आल्यापासून अनेक नेत्यांनी महायुतीत प्रवेश करीत असतांना गेल्या काही दिवसापासून जळगाव जिल्ह्यातील शरद पवार गटाचे जळगाव ग्रामीणचे उमेदवार अजित पवार गटात प्रवेश घेणार होते मात्र दादांच्या कार्यकर्त्यांनी विरोध केल्यानंतर आता माजी मंत्री गुलाबराव देवकर भाजपच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते गुलाबराव देवकर हे भाजपच्या संपर्कात आहेत. देवकर यांनी भाजपचे मंत्री गिरीश माहजन यांची भेट घेतल्याची देखील माहिती समोर येत आहे. दरम्यान गुलाबराव देवकर हे राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करण्यसाठी इच्छूक होते, मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेत्यांकडून त्यांच्या प्रवेशाला विरोध होत आहे. अजित पवार गटात प्रवेश देण्यास नकार मिळाल्याने गुलाबराव देवकर आता भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
दुसरीकडे गुलाबराव देवकर यांच्या पक्ष प्रवेशाबाबत प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी म्हटलं की, देवकर यांनी अद्याप अजित पवार यांची भेटच घेतलेली नाहीये. देवकर यांना पक्षात प्रवेश द्यायचा की नाही? याबाबतचा निर्णय वरिष्ठ नेतेच घेतील. देवकर यांनी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांची देखील भेट घेतल्याचं समजत असं पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता देवकर नेमका कोणत्या पक्षात प्रवेश करतात, भाजप की राष्ट्रवादी अजित पवार गट याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. जर देवकर यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला तर हा जळगावमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी मोठा धक्का ठरू शकतो.