मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावनिक आवाहन करुनही बंडखोर नेते एकनाथ शिंदे माघारी फिरायला तयार नाहीत. हे पाहून मुख्यमंत्र्यांनी शासकिय निवासस्थान ‘वर्षा’ बंगला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडतावेळी हजारो शिवसैनिक बंगल्याबाहेर जमले होते. यावेळी कट्टर शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या नावाच्या गगनभेदी घोषणा देऊन शिवसैनिक पक्षनेतृत्वाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असल्याचं दाखवून दिलं. यावेळी सगळेच कार्यकर्ते कमालीचे भावूक झाले होते. शेकडो शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंवर फुलांचा वर्षाव केला. मुख्यमंत्रीही शिवसैनिकांचं प्रेम पाहून गलबलून गेले, त्यांच्या डोळ्यात पाणी दाटलं होतं. त्यांनी शिवसैनिकांचं अभिवादन स्वीकारत गर्दीतून वाट काढली अन् गाडीत बसून मातोश्रीच्या दिशेने निघून गेले. यावेळी त्यांच्याबरोबर पुत्र आदित्य ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे देखील होत्या.
ठाकरे घराण्याला सत्तेचा, खुर्चीचा मोह नाही, हे अनेकदा बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे सांगायचे. पण आज प्रत्यक्षात उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राला फेसबुक लाईव्हद्वारे संबोधित केल्यानंतर अवघ्या २ तासांत वर्षा बंगला सोडला. शिवसेनेचा लढण्याचा इतिहास आहे. कितीही संकटे आली तरी आम्ही आमचा स्वाभिमान गहाण ठेवणार नाही. आम्ही असत्याच्या विरोधात लढणारे लोक आहोत. शेवटी सत्याचा विजय होईल, असं संजय राऊत यांनी सांगून एकनाथ शिंदेविरोधातला संघर्ष आणखी तीव्र झाल्याचंच एकप्रकारे अधोरेकित केलं.




















