जळगाव मिरर | २९ डिसेंबर २०२४
चोपडा तालुक्यातील विरवाडे येथील काही तरुणांनी एकत्र येत मद्याची पार्टी केली. मात्र, पार्टी केल्याची गोष्ट त्यातीलच एकाने मित्रांच्या घरी सांगितल्याचा संशय मनात ठेवत चार ते पाच जणांनी दादा बारकू ठाकूर (वय ३१) यांना जबर मारहाण करत त्यांच्या डोक्यात लाकडी दांडके टाकल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने चोपडा शहर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील विरवाडे गावातील दादा बारकु ठाकूर (वय ३१) आणि काही जणांनी पार्टी केली. मात्र, दादा ठाकूर यांनीच काहिंच्या घरी पार्टी केल्याची माहिती दिली, असा संशय आल्याने चार ते पाच जणांनी मिळून गावात सायंकाळी ७ ते ७.३० वाजेदरम्यान दादा ठाकूर यास जाब विचारत मारहाण केली. मारहाणीत त्यांच्या डोक्यात लाकडी दांडके टाकल्याने ते गंभीर जखमी झाले होत. त्यानंतर त्यांना चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून जळगाव हलवण्यात आले होते. मात्र, २८ रोजी सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी चोपडा शहर पोलिसांनी काहि संशयितांना ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत संशयितांची ओळख परेड आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.