जळगाव मिरर | ९ जानेवारी २०२५
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते अपघातातील पीडितांसाठी एक महत्वाची योजना जाहीर केली आहे. ‘कॅशलेस ट्रीटमेंट’ योजनेअंतर्गत, सरकार अपघात झालेल्या रुग्णांना उपचारासाठी सात दिवसांच्या कालावधीत १.५ लाख रुपयांपर्यंतचे खर्च उचलणार आहे.
योजना बद्दल बोलताना नितीन गडकरी म्हणाले, “आम्ही कॅशलेस ट्रीटमेंट हा एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. या योजनेअंतर्गत, अपघात झाल्यानंतर २४ तासांच्या आत रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णाच्या सात दिवसांच्या उपचारांचा खर्च सरकार उचलणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी, अपघाताची माहिती पोलिसांना देणे आवश्यक आहे. पीडितांच्या उपचारांवर जास्तीत जास्त १.५ लाख रुपये खर्च होणार आहे. तसेच, हिट अँड रन प्रकरणात मृत झालेल्या व्यक्तीसाठी सरकार दोन लाख रुपयांचे अनुदान देणार आहे.”
केंद्रीय मंत्री गडकरी यांनी दिल्लीतील भारत मंडपममध्ये झालेल्या वाहतूक मंत्र्यांच्या बैठकीत ही घोषणा केली. या बैठकीत रस्ते सुरक्षा आणि वाहतूक धोरणांमध्ये सुधारणा करण्यासंबंधी चर्चेचा मुख्य उद्देश होता. गडकरी म्हणाले, “हिट अँड रन प्रकरणात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना २ लाख रुपयांचे अनुदान देण्यात येईल.”
गडकरी यावेळी रस्ते अपघातांचा चिंताजनक आकडा देखील सादर केला. २०२४ मध्ये भारतात सुमारे १.८० लाख लोकांनी रस्ते अपघातात आपला जीव गमावला. यामध्ये १८ ते ३४ वयोगटातील तरुणांची संख्या विशेषतः जास्त आहे. गडकरी यांनी हे देखील सांगितले की, ३०,००० मृत्यू हे हेल्मेट न घालण्यामुळे झाले आहेत. रस्ते सुरक्षा ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.