जळगाव मिरर | १२ जानेवारी २०२५
बँकेतून काढलेले पैसे दुचाकीच्या डिक्कीत ठेवून शेख शोएब शेख शकील (वय २८, रा. गुलशनेरजा कॉलनी, पिंप्राळा) हे नमाज पठणासाठी गोकुळ स्वीट मार्टजवळील मशिदीमध्ये गेले. दरम्यान, त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीतून हेल्मेट घातलेल्या चोरट्याने १ लाख रुपयांची रोकड ठेवलेली पिशवी चोरुन नेली. ही घटना दि. १० रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील पिंप्राळा परिसरातील गुलशनेरजा कॉलनीत शेख शोएब शेख शकील हा तरुण वास्तव्यास असून तो एका खासगी फायनान्स बँकेत नोकरीला आहे. दि. १० जानेवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास तो डीएसपी चौकातील एचडीएफसी बँकेतून ८३ हजार रुपये काढले. त्याच्याजवळ असलेले १७ हजार रुपये एकत्र करुन त्यांचा भाऊ शेख शगीर शेख शकील याच्या खात्यावर टाकण्यासाठी ते एका पिवळ्या रंगाच्या पिशवीत ठेवले. त्या पिशवीमध्ये वेगवेगळ्या खातेदारांचे चेक असल्याने ते घेवून त्यांना चित्रा चौकातील बँकेत जायचे होते. परंतु त्यांची नमाज पठणाची वेळ झाल्याने ते (एमएच १९, डीक्यू ५७०२) क्रमांकाच्या दुचाकीने गोकुळ स्वीटमार्टजवळील मशिदीमध्ये आले. मशिदीच्या बाहेर त्यांनी दुचाकी लावून ते आतमध्ये नमाज पठाणासाठी गेले. बाहेर असलेल्या लोकांनी ज्युपिटर मोटारसायकल कोणाची आहे, तिच्या डिक्कीतून पिशवी काढून पळून जात आहे असा आवाज दिला.
नमाज पठण करीत असलेले शेख शोएब हे तात्काळ बाहेर आले असता, त्यांना एक हेल्मेट घातलेला इसमाच्या हातात पिवळी रंगाची पिशवी घेवून पळतांना दिसला. त्याच्या पुढे उभी असलेली एका दुचाकीवर बसून तो तेथून पसार झाला. शेख यांनी बँकेतून रक्कम काढल्यापासून दुचाकीस्वार त्यांचा पाठलाग करीत होते. बँकेतून निघाल्यानंतर शेख एका ठिकाणी थांबले तेथे त्यांच्या आजाबाजूलाच हे दुचाकीस्वार होते. त्यानंतर पुढे थांबून दुचाकी लागून गेल्यानंतर चोरट्यांनी एक लाखाची रक्कम लांबविली, असे शेख यांनी सांगितले. चोरटे सीसीटीव्हीमध्येही कैद झाल्याची माहिती त्यांनी दिली.