जळगाव मिरर | १५ जानेवारी २०२५
राज्यात गेल्या काही महिन्यापासून बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरण मोठे चर्चेत येत आहे. यातील आरोपी वाल्मीक कराडच्या रिमांडवर आता केज न्यायालयाऐवजी बीड जिल्हा न्यायालयातील विशेष मकोका कोर्टात सुनावणी पार पडली. सुनावणी दरम्यान तपास अधिकाऱ्यांकडून नवनवीन दावे आणि माहिती कोर्टासमोर सादर करण्यात आली. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने वाल्मीक कराडला 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, एसआयटीने 10 दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती.
वाल्मीक कराडला विशेष मकोका न्यायालयाने 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मकोका कायद्यांतर्गत ही कोठडी देण्यात आली आहे. या 7 दिवसांत वाल्मीक कराड याचा संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभाग होता का? यासह विविध बाबींची चौकशी एसआयटी करणार आहे.
संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या दिवशी वाल्मिक कराडचे आरोपी विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यात फोनवर संभाषण झाले होते. या तीनही आरोपींमध्ये 10 मिनिटे चर्चा झाली. संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबरला दुपारी 3 ते 3.15 वाजेच्या दरम्यान अपहरण झाले होते, असा एफआयआरमध्ये उल्लेख आहे. त्याच दिवशी दुपारी 3.20 मिनिटे ते 3.40 मिनिटे या काळात वाल्मिक कराडचे विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यामध्ये फोनवर वारंवार संभाषण झाल्याचा दाखला देत सरकारी वकिलांनी वाल्मिक कराडच्या 10 दिवसांची पोलीस कोठडी मागितली.
आरोपींनी कट रचून संतोष देशमुख यांचे अपहरण केले आणि मग हत्या केली आहे. या गुन्ह्यातले आरोपी सराईत आहेत. त्यांची आधीही गुन्हेगारी पार्श्वभूमी राहिलेली आहेत. आरोपी कृष्णा आंधळे अजून फरार आहे. त्याला लपण्यासाठी आरोपींनी मदत केली आहे का? हे तपासायचे आहे. तीन आरोपींमध्ये १० मिनिटे नेमकं काय संभाषण झाले हे तपासायचे आहे.
आरोपी विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यामध्ये इंटरलिंक्स काय आहेत का? याचा तपास सुरू आहे. फरार आरोपी अजून सापडायचे आहेत. कृष्णा आंधळे याला लपवण्यात यांचा हात आहे का? याची माहिती घ्यायची आहे. घुले आणि चाटे अनेक दिवस फरार होते. त्यांना कोणी मदत केली? याची माहिती घेणे सुरू आहे. सरकारी वकिलांनी यावेळी वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल का केला? याची देखील माहिती कोर्टात दिली. सरकारी वकिलांनी वाल्मिक कराडवर याआधी दाखल झालेल्या विविध गुन्ह्यांची माहिती कोर्टात सादर केली आणि त्याच आधारावर वाल्मिक कराडवर मकोका म्हणजे संघटीत गुन्हेगारीच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केल्याचे स्पष्ट केले.
