जळगाव मिरर | २५ फेब्रुवारी २०२५
राज्यात महायुती सरकार असून आज मंत्रालयात मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ७ महत्वाचे निर्णय घेण्यात आले असतांना त्यानंतर मंत्रालयात एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना घडली आहे. मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरून या तरुणाने उडी मारली. सुदैवाने सुरक्षा जाळीत अडकल्याने मोठा अनर्थ टळला असून या तरुणाचा जीव वाचला आहे. या वेळी पोलिसांनी जाळीवर जात तरुणाला धरून सुखरूप बाहेर काढले असल्याचे दिसते.
या तरुणाचे मंत्रालयातील महसूल विभागात काम होते. जागेच्या संदर्भात आपल्याला न्याय मिळत नसल्याचा आरोप या तरुणाने केला आहे. मात्र आपले काम होत नसल्याचे लक्षात आल्यावर इंकलाब जिंदाबादच्या घोषणा देत मंत्रालयातील चौथ्या मजल्यावरून त्याने थेट उडी मारली. मात्र जाळीवर अडकल्याने त्याचा जीव वाचला असून त्याला पोलिसांनी तातडीने मदत करत सुखरूप बाहेर काढले. या तरुणाचे अद्याप नाव समजू शकले नाही. तसेच पोलिसांनी पत्रकारांना या तरूणाशी संवाद साधण्यापासून देखील रोखल्याचे समोर आले आहे. यावर संतप्त पत्रकारांनी मंत्रालय पोलिस उपायुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले आहे. जनतेचे प्रश्न आम्ही मांडत असतो मात्र आम्हाला धक्काबुक्की केली जाते, असा आरोप यावेळी संतप्त पत्रकारांनी केला आहे.
