जळगाव मिरर | २७ फेब्रुवारी २०२५
यावल तालुक्यातील चिंचोलीत शेतातील विहिरीत बकऱ्यांसाठी पाणी घेण्याकरिता गेलेल्या २० वर्षीय तरुणीचा पाय घसरला आणि ती पाण्यात बुडाली. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. दरम्यान, ही तरुणी घरी परतली नाही म्हणून तिचा बुधवारी सकाळी शोध घेतला असता तिचा मृतदेह विहिरीत आढळून आला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील चिंचोली येथील रहिवाशी प्रज्ञा सुरेश साळुंखे (वय २०) ही तरुणी मंगळवारी शेत शिवारात त्यांच्या बकऱ्यांच्या गोठ्यात गेली होती. बकऱ्यांना पाणी पाजण्याकरिता ती तिच्या गोठ्यालगत असलेल्या भागवत रामचंद्र पाटील यांच्या शेतातील विहिरीवर गेली होती. तेथे हंडा आणि बादली घेऊन ती विहिरीतून पाणी भरत होती. दरम्यान, पाय घसरला अन् ती विहिरीतील पाण्यात बुडाली. दरम्यान, मंगळवारी रात्री उशिरापर्यंत प्रज्ञा ही घरी परतली नाही म्हणून कुटुंबीयांनी तिचा रात्री बराचवेळ शोध घेतला. तर एका विहिरीजवळ बादली आणि हंडा मिळाल्यानंतर त्यांनी रात्री विहिरीत डोकावून पाहिले. मात्र, तेथे काही दिसले नाही. दरम्यान, बुधवारी सकाळपासून या विहिरीत शोध घ्यायला सुरुवात केली असता तिचा मृतदेह विहिरीच्या तळाशी खोल पाण्यात आढळला.
दरम्यान, विहिरीत प्रचंड पाणी असल्यामुळे प्रज्ञा या तरुणीचा शोध घेण्याकरिता पाण्यात चित्रण करणारे कॅमेरे मागवण्यात आले. त्यात प्रज्ञा ही विहिरी खोल पाण्यात तळाशी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर दुपारी २ वाजता प्रज्ञाचा मृतदेह काढून यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आला. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे व डॉ. प्रशांत जावळे यांनी शवविच्छेदन केले. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पो. नि. प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार वसंत बेलदार करत आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील राकेश साठे, सरपंच अनिल सोळुंके, ग्रामपंचायत सदस्य मुकेश साळुंखे, प्रशांत कोळी, प्रभाकर साळुंखे यांनी विहिरीजवळ धाव घेतली. तसेच यावल पोलिसांना माहिती देण्यात आली. पो. नि. प्रदीप ठाकूर यांनी घटनास्थळी तातडीने हवालदार संदीप सूर्यवंशी, किशोर परदेशी यांना पाठवले होते.