जळगाव मिरर | ४ मार्च २०२५
गेल्या काही महिन्यापासून महायुती सरकारमधील अजित पवार गटाचे नेते व मंत्री धनंजय मुंडे मोठ्या अडचणीत आले आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख हत्येप्रकरणी वादात सापडलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना आजच राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. सोमवारी मध्यरात्री मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंडे यांच्याशी चर्चा केली. या बैठकीनंतर उद्या राजीनामा द्या असे मुंडे यांना सांगितले. त्यामुळे मुंडे आज राजीनामा देणार का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
विविध भ्रष्टाचार प्रकरणात आरोप झालेले धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी भेट घेतली. या भेटीत त्यांनी आपल्यावरील आरोपांबाबत स्पष्टीकरण दिले. धनंजय मुंडे हे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजीनामा देतील असा दावा त्यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी केला होता. मात्र, मुंडेंनी राजीनामा न दिल्याने त्यांचा दावा फोल ठरला होता. त्यानंतर करूणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला असून तो दोन तीन दिवसांत जाहीर केला जाईल, असा नवा दावा केला होता.
मंत्रिमंडळातील सदस्यांना राजीनामा मागण्याचा वा त्यांनी राजीनामा दिला नाही तर त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याचा अधिकार मुख्यमंत्री यांना असतो. काल मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यात बैठक झाली. या बैठकीत फडणवीस यांनी मुंडेंना उद्याच राजीनामा द्या असे सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर करूणा मुंडे म्हणाल्या की, धनंजय मुंडे यांचा शंभर टक्के राजीनामा होणार आहे. खरतर यापूर्वीच राजीनामा घेतला असता, मात्र तपासकार्य आणि लोकांचा दबाव बघून हा राजीनामा दोन दिवस पुढे ढकलण्यात आलेला आहे. आज किंवा उद्या दोन दिवसात राजीनामा घेण्यात येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाचे मी समर्थन करते, असे त्या म्हणाल्या.
