जळगाव मिरर | ५ मार्च २०२५
देशातील अनेक ठिकाणी घरगुती वादासह छोट्या मोठ्या कारणाने विवाहित पुरुष व महिला टोकाचे पाऊल उचलत असतांना नेहमीच दिसत असतात. आता हैदराबादमध्ये एका महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या आत्महत्येची घटना समोर आली आहे. २५ वर्षीय देविका हिने २ मार्चच्या रात्री रायदुर्गममधील प्रशांती हिल्स येथील तिच्या घरात छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर मृत देविकाच्या आईने एफआयआर दाखल केला. ज्यामध्ये असे म्हटले होते की, जावई सतीश लग्नापासूनच देविकाला हुंड्यासाठी त्रास देत होता. या गोष्टीला कंटाळून तिने आत्महत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार, देविका आणि सतीश एकाच सॉफ्टवेअर कंपनीत काम करायचे. दोघेही एकमेकांना २ वर्षांपासून ओळखत होते. दोघांनी ऑगस्ट २०२४ मध्ये गोव्यात लग्न केले. रायदुर्गम पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत, देविकाच्या आईने म्हटले आहे की, तिच्या जावयाने तिच्या मुलीवर तिच्या नावावर नोंदणीकृत घर त्याच्या नावावर हस्तांतरित करण्यासाठी दबाव आणला होता. तसेच हुंड्यासाठी छळ केला. देविकाच्या कुटुंबीयांनी माध्यमांना सांगितले की, देविकाचा पती हुंड्यासाठी तिचा छळ करायचा. तिला शारीरिक आणि मानसिक छळ सहन करावा लागला. आणखी सहन न झाल्याने तिने आत्महत्या केली.
रात्री टीव्ही रिमोटवरून भांडण झाले सुरुवातीच्या तपासानंतर एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, २ मार्चच्या रात्री पती-पत्नीमध्ये टीव्ही रिमोटवरून वाद झाला, त्यानंतर पती घरातून निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो परत आला तेव्हा त्याला त्याची पत्नी मृत आढळली. यानंतर त्याने पोलिसांना आणि कुटुंबाला सांगितले की त्याच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रायदुर्गम पोलिसांनी पती सतीशविरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे. देविकाच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम उस्मानिया रुग्णालयात करण्यात आले.