जळगाव मिरर | १२ एप्रिल २०२५
राज्यात उन्हाचा पारा वाढत असल्याने अनेक ठिकाणी आगीच्या घटना सातत्याने घडत आहे तर आता नागपूर जिल्ह्यातील उमरेड एमआयडीसी मध्ये ॲल्युमिनियम फॉइल बनवणाऱ्या कंपनीत आग लागली आहे. या स्फोटात पाच जणांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर जखमींवर नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
उमरेड येथील ॲल्युमिनियम फॉइल बनवणाऱ्या कारखान्यात झालेल्या या स्फोटात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. दोघांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेत बेपत्ता असलेल्या 3 जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. या संदर्भात नागपूर ग्रामीणचे एसपी हर्ष पोद्दार यांनी वृत्तसंस्थेला दिली आहे. यात सुरुवातीला सहा जण जखमी झाले होते. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर होती. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर जखमींना नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून उमरेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनाजी जलक अधिक तपास करत आहेत.
शुक्रवारी रात्री उशिरा जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर आणि पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी घटनास्थळी पाहणी केली. या स्फोटाबद्दल त्यांनी सांगितले की, हा कारखाना नागपूरच्या उमरेड तालुक्यात आहे. कारखान्याच्या पॉलिश केलेल्या ट्यूबिंग युनिटमध्ये स्फोट झाला आहे. MMP ही ॲल्युमिनियम फॉइल आणि पावडर तयार करणारी कंपनी आहे.
ॲल्युमिनियम फॉइल आणि पावडरचा वापर पॅकेजिंगसाठी करण्यात येतो. या कंपनीत एकूण १५० कामगार आहेत. सायंकाळच्या शिफ्टमध्ये अंदाजे १५० कामगार कामावर होते. स्फोट झाल्यानंतर आगीचा भडका उडाला. दरम्यान कामगार आपला जीव मुठीत घेऊन बाहेर धावत सुटले यामुळे अनेक कामगार थोडक्यात बचावले. पण काही जण अडकले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या कंपनीचा मालक भंडारा येथील रहिवासी ललित भंडारी नावाचा व्यक्ती आहे. धुरखेडा ग्रामपंचायत क्षेत्रात असलेली ही कंपनी सुमारे दहा एकर क्षेत्रात पसरलेली आहे. स्फोटाचे कारण अद्याप कळलेले नाही. जखमींची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.