
जळगाव मिरर | २८ एप्रिल २०२५
जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना सातत्याने घडत असतांना आता रावेर तालुक्यातील बोर घाटात झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील वडील आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला. थार जीप आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत मोटरसायकलस्वार पिंटू बोडोले (वय 30) आणि त्यांचा तीन वर्षांचा मुलगा ऋतिक बोडोले यांचा दुर्दैवी अंत झाला. या दुर्घटनेने संपूर्ण रावेर तालुक्यात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंटू बोडोले हे पत्नी मालुबाई (वय 28) आणि दोन मुले -ऋतिक (वय३) व आठ महिन्यांचा टेंगुराम – यांच्यासह भुसावळहून पाल येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी निघाले होते. रविवार (दि.27) रोजी रात्रीच्या सुमारास बोर घाटात, खेरगावकडून भुसावळकडे भरधाव वेगाने येणाऱ्या थार जीपने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की पिंटू आणि त्यांच्या लहानग्या ऋतिकचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
बोडोले कुटुंब भुसावळ येथे मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत होते. गरीब आणि अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्या या आदिवासी कुटुंबावर अचानक मोठे संकट कोसळले असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताची माहिती मिळताच भाजप रावेर पूर्व तालुकाध्यक्ष रविंद्र पाटील व बाळा आमोदकर यांनी तातडीने रावेर ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. जखमी मालुबाई बोडोले आणि आठ महिन्यांचा टेंगुराम यांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी फैजपूर येथे हलवले आहे. त्यांनी शोकाकुल कुटुंबीयांचे सांत्वन केले. दरम्यान, पोलिसांनी संबंधित थार जीप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.