
जळगाव मिरर | २९ एप्रिल २०२५
गेल्या काही दिवसापूर्वी राज्यातील सोलापुर शहरातील प्रख्यात मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांनी गोळी झाडून आत्महत्या केली होती. हे प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एका शासकीय रुग्णालयात इंटर्नशिप करणाऱ्या डॉक्टरने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. चाकूच्या साहाय्याने स्वतःचा गळा कापून घेत आत्महत्या केल्याने वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
डॉ. आदित्य नमबियार असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. आदित्य भाड्याच्या रूममध्ये राहत होता आणि तिथेच त्याने चाकूच्या साहाय्याने स्वतःचा गळा कापून घेत आयुष्य संपवलं. आदित्यने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांचं आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच आणखी एका डॉक्टरची आत्महत्या झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
डॉ. आदित्य नमबियार याने नुकतंच एम.बी.बी.एस.चे शिक्षण पूर्ण केलं होतं. तो शिकाऊ डॉक्टर आहे. आदित्य सोलापुरातील एका भाड्याच्या रूममध्ये राहत होता. रूमच्या बाथरूममध्ये त्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्याच्या मृतदेहाच्या शेजारी एक चाकू आणि कात्री आढळून आली असून त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाकडे रवाना करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या पोलीस पुढील तपास करीत आहेत.