
जळगाव मिरर | २१ मे २०२५
चाळीसगाव शहरात अत्याचाराच्या गुन्ह्यात सहआरोपी करण्याची धमकी देत पोलीस कर्मचाऱ्याने सव्वा लाखाची खंडणी घेतल्याचा प्रकार उघडकीस आला होता याप्रकरणाची गंभीररित्या दखल घेत चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून खंडणी घेणाऱ्या अजय पाटील याला निलंबीत केले. याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढले.
सविस्तर वृत्त असे कि, चाळीसगावातील स्वप्निल राखुंडे या व्यावसायीकाकडे दोन पोलीस कर्मचारी आले. त्यांनी निखील राठोड यास ओळखता का अशी विचारणा केली. त्यानंतर पोलिसांनी राखुंडे यांना राठोड याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल आहे. पोस्कोतंर्गत दाखल असलेल्या या गुन्ह्यात तुमच्या भावासह तुमच्या आईला गुन्ह्यात अडकविण्याचे धमकी देत राखुंडे यांच्याकडून १ लाख २० हजार रुपयांची खंडणी घेतली होती. दरम्यान, सोमवार दि. १९ रोजी आमदार मंगेश चव्हाण हे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून त्यांनी पोलिसांकडे तक्रारींचा पाढा वाचला. त्यानंतर खंडणी घेणाऱ्या अजय पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेची पोलीस अधीक्षकांनी गंभीररित्या दखल घेत, चाळीसगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांची नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली केली असून गुन्हा दाखल झालेल्या अजय पाटील या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबीत केले आहे. या घटनांमुळे पोलीस दलात खळबळ माजून गेली आहे




















