जळगाव मिरर | १६ ऑक्टोंबर २०२६
शेतातील विहरीवर लावलेली पाण्याची मोटार सुरु करण्यासाठी गेलेल्या यशवंत भिका ताडे (वय ५०, रा. शिरसोली, ता. जळगाव) यांचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना गुरुवार दि. १५ ऑक्टोंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. वडीलांचे निधनाचे दुःख कायम असतांनाच मुलाचा देखील दुर्देवी मृत्यू झाल्याने ताडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील शिरसोली येथे यशवंत ताडे हे वास्तव्यास असून त्यांचे गावालगतच शेती आहे. त्यांच्या वडीलांचे काही दिवसांपुर्वीच निधन झाले होते. वडिलांच्या निधनाचे दुःख कायम असतांनाच त्यांचे १३ दिवसांचे विधी पूर्ण झाल्यानंतर यशवंत ताडे हे रखडलेली शेतीची कामे उरकण्यासाठी गुरुवारी शेतात गेले होते. दुपारी २ वाजेच्या सुमारास शेतात गेल्यानंतर पिकांना पाणी देण्यासाठी यशवंत हे विहिरीवरील पाण्याची मोटार सुरू करण्यासाठी गेले. मात्र, तिथेच त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला आणि ते जमिनीवर कोसळले. ही बाब शेजारील शेतात काम करणाऱ्या काही जणांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने धाव घेतली.
स्थानिकांनी लागलीच त्यांना जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. अवघ्या पंधरा दिवसांच्या अंतराने घरात आधी वडील आणि नंतर कर्त्या मुलाचा मृत्यू झाल्याने ताडे कुटुंबावर टुंबावर आघात झाला आहे. यशवंत ताडे यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे.




















