
जळगाव मिरर | ५ जून २०२५
राज्यातील शिवसेनेत फूट पडल्यापासून शिंदे गटाचे नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे कट्टर विरोधक असणाऱ्या उद्धवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांना आता उपनेता पदावर बढती मिळाली आहे. यासह रावेर लोकसभा मतदारसंघ आणि नंदुरबार जिल्हयाच्या संपर्क प्रमुखाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
१९८४ मध्ये धरणगावात विद्यार्थी सेनेच्या शाखेची स्थापना केल्यानंतर गुलाबराव वाघ शिवसेनेशी जोडले गेले होते. त्यानंतर त्यांना नेतृत्व गुणांच्या जोरावर शिवसेनेत विविध पदांवर काम करण्याची संधी मिळाली. शिवसेनेत फूट पडल्यानंतर गुलाबराव पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. मात्र, गुलाबराव वाघ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापासून दूर गेले नाहीत. त्यांनी शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला.
लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुकीतील दारूण पराभवानंतर अनेक मातब्बरांनी पक्ष सोडला, तरी वाघ उद्धवसेनेशी एकनिष्ठ राहिल्यानेच त्यांना उपनेतेपदी बढती मिळाली. वाघ यांना उशिरा का होईना पक्षाने न्याय दिल्याची भावना त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये आहे.




















