
जळगाव मिरर | ७ जून २०२५
राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना घडत असतांना तरी देखील नेहमीच पुणे जिल्हा अनेक गुन्हेगारीच्या घटनेने चर्चेत येत असतांना आता जमिनीचे वाद, याच जमिनीच्या वादातून एका वकिलाने थेट बंदूकच बाहेर काढल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यात जमिनीच्या वादातून सुरू झालेली गुंडगिरी काही नवीन नाही. मुळशी पॅटर्न सारखा चित्रपट देखील याच घटनांवर आधारित आहे. असाच काहीसा प्रकार आता हिंजवडी जवळ असलेल्या कासारसाई येथे घडला आहे. वादात जमीन पाहण्यासाठी गेलेल्या वकिलाला जमिनीच्या मालकाने अडवल्यानंतर वकिलाने थेट बंदुकीचा धाक दाखवला आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
बंदूक दाखवत दहशत दाखवणाऱ्या वकीलाचे नाव संदीप भोईर असे आहे. ते धनंजय वाडकर यांचे वकील आहेत. कासारसाई येथील शब्बीर मुलानी आणि वाडकर यांच्यात जमिनीवरून गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू आहेत. मुलानी यांची काही जमीन वाडकरांनी खरेदी केली. मात्र, ही जमीन कूळ कायद्यात मोडत असल्यानं यासाठी गेली 10 ते 12 वर्षांपासून न्यायालयीन लढा सुरू आहे. त्यातच, आज दुपारी दोनच्या सुमारास वकील संदीप भोईर हे कासारसाईत गेले, तेव्हा त्या वादातील जमिनीच्या ठिकाणी निघाले असता मुलानी कुटुंबात आणि त्यांच्यात वाद झाले. हा वाद इतका वाढला की वकिलाने थेट बंदूकच बाहेर काढली.
वकील भोईर हे वादात असलेली जमीन पाहण्यासाठी गेले असता त्यांना मुलानी कुटुंबाने अडवले. यावेळी दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर वकील भोईर यांनी त्यांच्या कंबरेला लावलेली बंदूक बाहेर काढत धाक दाखवण्याचा प्रयत्न केला. बंदूक बाहेर काढल्याचे पाहताच मुलानी कुटुंब देखील आक्रमक झाले. त्यानंतर वकील आणि त्यांचा साथीदार पळून गेले. दरम्यान, आता दोन्ही बाजूच्या मंडळींना हिंजवडी पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले असून चौकशी केली जात असून कारवाई केली जाणार असल्याची माहिती आहे.




















