जळगाव मिरर | ९ जून २०२५
राज्यातील मध्य रेल्वेच्या दिवा ते मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. कसाऱ्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधून पडून ६ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. एक लोकल कसाऱ्याच्या दिशेनं येत होती. तर, दुसरी लोकल सीएसएमटीच्या दिशेनं जात होती. दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान, या दोन्ही धावत्या लोकल एकमेकांच्या जवळून गेल्याने फुटबोर्डवर उभे असलेल्या प्रवाशांचा तोल जाऊन काही प्रवासी खाली पडले. आता यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या रेल्वे दुर्घटनेसाठी परप्रांतीयांना जबाबदार धरले आहे. आपल्याकडे टाऊन प्लॅनिंग नावाची गोष्टच नाही. बाहेरून येणारे लोंढे आपल्या शहरांवर आदळत आहेत. त्यामुळे रेल्वे सेवा कोलमडली आहे. रेल्वेचा व ट्रॅफिक व्यवस्थेचा पूर्णतः बोजवारा उडाला आहे. मेट्रो व मोनो रेलमुळे हा प्रश्न सुटणार नाही. सर्वजण निवडणुका, प्रचार व इतर गोष्टींमध्येच गुंतले आहेत, असे ते म्हणालेत.
राज ठाकरे सोमवारी पुणे दौऱ्यावर होते. तिथे त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी मुंबई रेल्वे दुर्घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, ही रेल्वे चालतेच कशी? हेच एक आश्चर्यच आहे. मुंबईतील लोकांनी अनेकदा या प्रकरणी एक वेगळे महामंडळ स्थापन करण्याची मागणी केली आहे. पण त्यावर काहीही होत नाही.
ते पुढे म्हणाले, आपल्या सगळ्या शहरांचा विचका झाला आहे. कुठेही रस्ते नाहीत. पण रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली सर्वत्र उंचउंच इमारती उभ्या राहत आहेत. रस्ते नसल्यामुळे पार्किंगची व्यवस्था नाही. पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे ट्रॅफिक अडली जाते. कुठे आगली लागली तर फायर ब्रिगेडचा बंबही तिकडे जाऊ शकत नाही अशी आपल्या शहरांची अवस्था झाली आहे. टाऊन प्लॅनिंग नावाची गोष्टच आपल्याकडे नाही. मी गेली अनेक वर्षांपासून सांगत आहे की, बाहेरून येणारे जे लोंढे आपल्या शहरांवर आदळत आहेत, त्यामुळेच ही रेल्वे कोलमडली आहे. रेल्वेचा बोजवारा उडाला आहे. सगळ्या ट्रॅफिकचा बोजवारा उडाला आहे.
लोकांना चालण्यासाठी फुटपाथ नाहीत. वाहनांसाठी रस्ते नाहीत. कोण येतंय, कोण जातंय याची माहिती नाही. मेट्रो व मोनो रेलेमुळे प्रश्न सुटणार नाही. मुंबईत मोनो रेल आहे, मेट्रो आहे, मग गाड्यांचे रजिस्ट्रेशन थांबले का? टू व्हिलर, फोर व्हिलरचे रजिस्ट्रेशन थांबले का? नाही थांबले. म्हणजे त्या गाड्या येतच आहेत. मग ही नक्की मेट्रो व मोनो रेल कोण वापरत आहे? कोण काय करतंय? कुणीही पाहायला तयार नाही. सर्वजण निवडणुका, प्रचार आणि इतर गोष्टींतच गुंतले आहेत. शहरे म्हणून याकडे पाहण्यास कुणीही तयार नाही आणि शहरांवर बोलणाऱ्यांना माध्यमांमध्ये किंमत नाही, असे राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे यांनी यावेळी माध्यमांवरही आगपाखड केली. ते म्हणाले, मागील काही दिवसांत राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र येणार याच्या जेवढ्या बातम्या लावल्या, तेवढा काळ तुम्ही आज रेल्वे अपघातात जे बळी गेले त्यांच्या बातम्या लावणार आहात का? आपण कशाला महत्व द्यायचे हेच कुणाला समजत नाही. शहरी भागातील पत्रकारांनी शहरांतल्या प्रश्नांवर जास्त लक्ष केंद्रीत केले पाहिजे. सरकारचे या गोष्टींकडे कसे लक्ष जाईल? यावर लक्ष द्या. बाकीच्या सगळ्या गोष्टी फार किरकोळ आहेत.
असे अपघात घडणे दुर्देवी बाब आहे. केंद्र सरकारने यावर लक्ष दिले पाहिजे. तातडीने लक्ष दिले पाहिजे. रेल्वे फलाटावरील गर्दी पाहिली तर प्रवाशी कसे आत जातात व कसे बाहेर येतात याची कल्पना करवत नाही. रेल्वेने मी स्वतः प्रवास केला आहे. कॉलेजला असताना मी हार्बर लाईनवरून प्रवास केला. त्यामुळे रेल्वेचा प्रवास काय असतो? हे मला माहिती आहे. त्यावेळी गर्दी कमी असायची. पण आता गर्दी तुडुंब वाढली आहे. सायंकाळच्या वेळी रेल्वे प्लॅटफॉर्म व रेल्वेत तुम्ही शिरून दाखवा. विलक्षण आहे सगळे. रेल्वे मंत्री काय करत आहात? रेल्वेने राजीनामा देण्यापेक्षा स्थिती सुधारण्यावर भर द्यावा, असे ते म्हणाले.
