
जळगाव मिरर | २२ जून २०२५
राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा होत असतांना आता दोन्ही नेत्यांकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात येत आहे. मात्र, प्रत्येक्षात अद्याप टाळी वाजलीच नाही. यावरून मनसेचे मुंबईचे अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधत “अचानक एवढा उत्साह का? शरद पवारांसोबत जाताना कार्यकर्त्यांना विचारलं होतं का?” असा सवाल केला होता. याच प्रश्नाला खासदार संजय राऊत यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
देशपांडेंनी केलेल्या विधानाचा समाचार घेताना आणि ठाकरे बंधूंच्या मनोमिलनावर बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे भाऊ आहेत. दोन्ही नेते अंतिम निर्णय घेतील. आज जे कुणी बोलत आहेत, ते राजकारणात उशीरा आले आहेत. ठाकरे कुटुंबाशी माझे दीर्घकाळचे संबंध असल्यामुळे काय होणार आणि काय होणार नाही याची मला माहिती आहे, आणि ती इतकी कुणाकडेही नाही’, असं संजय राऊत म्हणाले.
देशपांडे यांचं नाव न घेता अप्रत्यक्ष टीका करत राऊत म्हणाले, ‘त्यांच्या बोलण्याचा काही अर्थ नाही आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या म्हणण्याला अर्थ आहे. कोण काय म्हणेल याला अर्थ नाही, असं संजय राऊत म्हणाले. आमच्याकडील कुणी त्यांच्या विरूद्ध बोलणार नाही आणि त्यांच्याकडील कुणीही आमच्याबद्दल बोलणार नाही’, असं संजय राऊत म्हणाले.
‘एकेकाळी महाविकास आघाडीसुद्धा अशक्य वाटत होती. पण काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन सरकार स्थापन केलं. मुख्यमंत्री झाले आणि तीन वर्ष सरकार व्यवस्थित चाललं. राजकारणात माणसाने आशावादी असले पाहिजे. काही लोकांना संयम आणि राजकीय प्रशिक्षणाची गरज आहे’, असंही संजय राऊतांनी स्पष्ट केलं.
राजकीय संयमावर भाष्य करताना राऊत म्हणाले, ‘नुसतं उखळ पणा करून राजकारणात कुठेही चालत नाही. विशेषतः जेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न, मराठी माणसाच्या न्याय हक्काचा प्रश्न येतो, तेव्हा संयम आणि त्याग या दोन गोष्टी असल्याशिवाय महाराष्ट्राचा नेतृत्व आपण करू शकत नाही’.




















