जळगाव मिरर | २ जुलै २०२५
भडगाव शहरातील पाचोरा चौफुलीजवळ सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करत तसेच पोलीस ठाण्यात पोलिसांशी हुज्जतबाजी करून सार्वजनिक शांततेचा भंग केला म्हणून तिघांविरुद्ध भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, पो.हे.कॉ. ज्ञानेश्वर नाना पाटील, पो. हे. कॉ. विजय जाधव व पोलीस नाईक मंगलसिंग गायकवाड हे तिघे पोलीस कर्मचारी शासकीय कर्तव्य पार पाडत होते. या वेळी संशयित राजेंद्र खैरे व अन्य दोघांना विचारपूस करत असताना पो. हे. कॉ. ज्ञानेश्वर पाटील यांची संशयित राजेंद्र खरे याने कॉलर पकडून कानशीलात मारली. त्याचवेळी पो. हे. कॉ. विजय जाधव व पो.ना. मंगलसिंग गायकवाड यांनी संशयित राजेंद्र खैरे यास अडवले असता संशयित विक्की सोनवणे व प्रतिक सोनवणे यांनी अश्लील शिवीगाळ करत धमकी देत त्यांना ही धक्काबुक्की केली.
तसेच पोलीस ठाणे अंमलदार, बारनिशी कक्षातील बारनिशी यांची शासकीय खुर्ची जोरात आदळून नुकसान केले. तसेच शासकिय कामात अडथळा आणून सार्वजनिक ठिकाणी आरडाओरड करुन सार्वजनिक शांतता भंग केली. या प्रकरणी पो.हे.कॉ. ज्ञानेश्वर नाना पाटील (वय ४५) यांच्या फिर्यादीवरून शहरातील यशवंत नगरमधील राजेंद्र रमेश खैरे (वय ३६), विक्की रमेश सोनवणे (वय २८) व प्रतिक मार्तंड सोनवणे (वय १९) या तिघांविरुद्ध भडगाव पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे करत आहेत.
