जळगाव मिरर | २ जुलै २०२५
साफसफाई करण्याच्या कारणावरून तीन जणांनी शरीफ खान सिकंदर खान (रा. सालार नगर) यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. यावेळी एका जणाने डोक्यात लोखंडी रॉड मारून गंभीर जखमी केले. तसेच या ठिकाणी काम करणाऱ्या महिलेला खान यांनी शिवीगाळ करीत दमदाटी केली. ही घटना दि. ३० जून रोजी सेंट जोसेफ शाळेसमोर घडली आहे. परस्परविरोधी तक्रारीवरून रामानंद नगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील सालार नगरात शरीफ खान सिकंदर खान हे वास्तव्यास आहे. ते सेंट जोसेफ शाळेत साफसफाईचे काम करतात. साफसफाई करण्याच्या कारणावरून दि. ३० जून रोजी तेथेच काम करणाऱ्या कोकीळा गोविंद साळी यांच्यामध्ये वाद झाला. त्यावरून सदर महिला, तिचा मुलगा व अन्य एका जणाने खान यांना शिवीगाळ व दमदाटी केली. तर महिलेच्या मुलाने डोक्यात लोखंडी रॉड मारून दुखापत केली. याप्रकरणी खान यांचा मुलगा शाकीब खान यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी फिर्याद महिलेने दिली असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, साफसफाई करण्याच्या कारणावरून शरीफ खान याने शिवीगाळ करीत दमदाटी केली. या प्रकरणी शरीफ खानविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
