जळगाव मिरर | २ जुलै २०२५
राज्यातील महायुती सरकार शेतकऱ्यांना आर्मनिर्भर अर्थात स्वावलंबी बनवण्याचे अनेक दावे करत आहे. पण या दाव्यांची चिरफाड करणारा एक व्हिडिओ लातूर जिल्ह्यातून समोर आला आहे. या व्हिडिओत एका 65 वर्षीय शेतकऱ्याने बैल नसल्यामुळे स्वतःला त्याच्या जागी जुंपल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला असून, त्यावर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
गत 1 जुलै रोजी राज्यात कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शेतकऱ्यांना नवनवे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याच्या मुद्यावर उहापोह करण्यात आला. या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था स्पष्ट करणारा हा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून कोणत्याही संवेदनशील व्यक्तीचे हृदय भरून येतील. व्हायरल व्हिडिओ हा लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील हाडोळती गावचा आहे. त्यात अंबादास पवार व त्यांच्या पत्नी शांताबाई पवार हे दोघे बैल नसल्यामुळे स्वतःच्या खांद्यावर जू घेऊन शेतीची मशागत करताना दिसून येत आहेत.
अंबादास पवार याविषयी बोलताना सांगतात, कुटुंबाचा चरितार्थ चालवताना आमच्यावर ही वेळ आली. सध्या मजुरीचा खर्च अमाप वाढला आहे. ट्रॅक्टरने पेरणी करणे परवडत नाही. आम्ही बैल बारदानाही घेऊ शकत नाही. शेतीत जेवढे पैसे लावले, त्याहून कमी पैसे हातात येतात. आम्ही बँकेकडून 40 हजारांचे कर्ज घेतले आहे. ते कर्ज आम्ही दरवर्षी भरतो. पुन्हा काढतो. आमचे गळ्याएवढे सोयाबीनचे पोते 4 हजार रुपयांना जाते. पण अवघ्या 25 किलोची सोयाबीनच्या बियाण्यांची बॅग 3 हजार घ्यावी लागते. खताचा भाव 1200 ते 1500 रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे शेतीतून जेवढे उत्पन्न निघते. तेवढ्यातच भागवावे लागते.
शांताबाई पवार यांनी यावेळी सरकारकडे कर्जमाफीची मागणी केली. आमच्याकडे 5 एकर सामायिक जमीन आहे. पण पाण्याची सोय नाही. आमचा मुलगा पुण्यात जाऊन पोट भरतो. मुलगा शिकला नाही म्हणून ही वेळ आली आहे. आमच्या नातवंडांवर तरी अशी वेळ येऊ नये. त्यामुळे जोपर्यंत हात-पाय चालत आहेत, तोपर्यंत आम्ही शेतात काम करतो. हे काम करण्याशिवाय आमच्यापुढे दुसरा कोणता पर्यायही नाही. शासनाने आमचे कर्ज माफ करून खते व बियाण्यांची व्यवस्था करावी, असे त्या म्हणाल्या.
उल्लेखनीय बाब म्हणजे महाराष्ट्र हे भारताचे कृषिप्रधान राज्य आहे. शेती हा येथील लाखो लोकांच्या जीवनाचा आधार आहे. पण दुष्काळ, अतिवृष्टी, कर्जबाजारीपणा, बाजारातील अस्थिरता आणि पुरेशा सरकारी पाठबळाचा अभाव यामुळे शेतकऱ्यांचे जीवन सतत संकटात सापडले आहे. या परिस्थितीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला असून, शेतकऱ्यांचे सामाजिक आणि आर्थिक स्थैर्य धोक्यात आले आहे. या समस्येचे मूळ शोधून त्यावर उपाययोजना करणे आजच्या काळाची गरज आहे.
